रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी परळी रेल्वे स्थानकावरील धरणे आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मागण्या मान्य न झाल्यास लवकरच रेल्वे रोको आंदोलन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी वैजनाथ रेल्वे विकासाच्या प्रश्नांकडे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व रेल्वे स्थानकाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे स्थानक परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला नागरिक,व्यापारी, महिला आणि रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या सर्व न्याय मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांकडे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दि. ८ जून रोजी परळी रेल्वे स्थानक परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
परळी वैजनाथ व बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या रेल्वे सुविधा, पायाभूत विकास आणि पर्यटनवृद्धीच्या विविध मागण्यांसंदर्भात परळी रेल्वे विकास समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाला शंभर वर्षांहून अधिक इतिहास असून दक्षिण मध्य रेल्वेतील सिकंदराबादनंतर सर्वाधिक महसूल देणाऱ्या स्थानकांपैकी एक असूनही या भागाकडे विकासाच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परळी जंक्शनचा समावेश मध्य रेल्वेमध्ये करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. परळी येथे पिट लाईन मंजूर करून नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ मंदिरात दरवर्षी लाखो भाविक येत असल्याने रेल्वे स्थानकावर यात्रेकरू व पर्यटक माहिती केंद्र सुरू करावे,अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबई-लातूर एक्सप्रेस, मछलीपट्टणम- बिदर एक्सप्रेस आणि हैदराबाद-बिदर इंटरसिटी या गाड्या परळी वैजनाथपर्यंत वाढविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय चार ज्योतिर्लिंगांना जोडणारी ‘ज्योतिर्लिंग एक्सप्रेस’, सिकंदराबाद-जम्मू तवी, कन्याकुमारी-उधमपूर, रामेश्वरम-ओखा तसेच हैदराबाद-अजमेर या नव्या रेल्वे सेवांचा प्रारंभ परळी मार्गे करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि हैदराबादसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. कोल्हापूर-नागपूर आणि कोल्हापूर- धनबाद या परळीमार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या दररोज सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी समितीने केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जालालपूर परिसरात नवीन रेल्वे उड्डाणपूल (ROB), पांडे फार्म परिसरात आणि शिवाजीनगर भागात अंडरपास उभारण्यात यावेत. तसेच मानवत रोड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गासाठी विशेष निधी मंजूर करावा. घाटनांदूर -दौंड (अंबाजोगाई -जामखेड मार्गे) तसेच बेलापूर (श्रीरामपूर)-परळी वैजनाथ (नेवासा-गेवराई मार्गे) या नवीन रेल्वे मार्गांच्या प्रकल्पांना गती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. परळी वैजनाथ हे धार्मिक,व्यापारी व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने रेल्वे सुविधांचा विस्तार झाल्यास बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल,असा विश्वास परळी रेल्वे विकास समितीने व्यक्त केला आहे.
यावेळी परळी रेल्वे विकास समितीचे जी.एस.सौंदळे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,पी.एस. घाडगे, निमंत्रक विलास ताटे, मुख्य समन्वयक कैलास तांदळे, सत्यनारायण दुबे,आर.जी. स्वामी, मराठवाडा जनता विकास परिषदचे चेतन सौंदळे, श्रीकांत पाथरकर,माऊली आघाव, नगरसेवक सचिन सारडा,अनंत इंगळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर बियाणी,बंडू गरुड,सुरेश टाक,ॲड.अरुण पाठक,ॲड.रमेश साखरे, प्रा. शंकर कापसे,सिद्धेश्वर शेटे,महादेव गंगणे,सुनील जठार,तुकाराम मुंडे,मिलिंद घाडगे, दिलीप जोशी,संदिप तीळकरी, आत्मलींग शेटे,शेख अब्दुल करीम,शेख एजाज,सौ.चित्रा देशपांडे, विजयाताई दहिवाळ,सौ. विद्या खिस्ते,चंद्रकांत उदगीरकर,भागवत गित्ते, अब्दुल शकील,खंडांगळे सी. पी.,काशिनाथराव पाटील,सुमित कलशेटे, राजाराम लोखंडे,बालासाहेब गित्ते,शरद कावरे, पुरुषोत्तम जोशी,प्रणव परळीकर,शेख मूकरम,बालाजी घोडके,उमेश गुप्ता, महाविर संघाई, सुभाष वाघमारे,मानवत रेल्वे विकास समितीचे के. डी. वर्मा, पांडूरंग गंगावरे यांच्यासह विविध संघटनाचे,परळी वैजनाथ परिसराततील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा