महावितरण जागे होणार की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार?

 महावितरणचा बेशिस्त कारभार; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!

रात्रभर वीज गायब; उकाडा, डास आणि अंधारात नागरिकांचा अक्षरशः छळ

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचा भोंगळ, ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वीज गुल झाल्यानंतर संपूर्ण रात्र नागरिकांनी उकाडा, डासांचा त्रास आणि असह्य घुसमटीत काढली. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.

एका बाजूला प्रचंड उष्णता आणि दुसऱ्या बाजूला डासांचा वाढता त्रास यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींची अक्षरशः परवड झाली. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि इतर आवश्यक साधने बंद पडली. रात्रभर झोप न लागल्याने नागरिक हैराण झाले.

विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांचे फोन उचलले गेले नाहीत. नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची देखभाल व दुरुस्ती झाल्याचे दावे केले जातात. मात्र चार-पाच थेंब पावसातच वीजपुरवठा कोलमडत असेल, तर ही देखभाल नेमकी कागदावर झाली की प्रत्यक्षात, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांच्या मते, महावितरणमधील काही मुजोर अधिकारी आणि बेशिस्त कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील लोकप्रतिनिधी आणि पुढारी मात्र या गंभीर प्रश्नावर शांत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. "पुढारी शांत... नागरिक हतबल..." अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाळ्याची सुरुवातही झालेली नसताना ही अवस्था असेल, तर पुढील काळात परिस्थिती आणखी भीषण होण्याची भीती व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी महावितरण प्रशासनाला इशारा देत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनआक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही देण्यात येत आहे.

संतप्त नागरिकांचे सवाल...

  • चार थेंब पावसात वीज जाते, मग मुसळधार पावसात काय होणार?
  • देखभाल-दुरुस्तीची कामे नेमकी कुठे झाली?
  • नागरिकांचे फोन का उचलले जात नाहीत?
  • रात्रीच्या आपत्कालीन परिस्थितीत जबाबदार अधिकारी कुठे होते?
  • नागरिकांच्या हालअपेष्टांची जबाबदारी कोण घेणार?

"महावितरण जागे होणार की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार?" हा प्रश्न आता परळीकर विचारत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार