खोडवा सावरगाव येथील पाणंद रस्त्याचे निकृष्ट काम;सखोल चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याच्या कामात झालेल्या कथित अनियमिततेबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती परळी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खोडवा सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा पाणंद रस्ता दत्तात्रय मानाजी दहिफळे यांच्या शेतापर्यंत करण्यात आला आहे. या रस्त्याचे काही ठिकाणी १० फूट तर काही ठिकाणी २० फूट रुंदीचे काम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर मोठे दगड व खडी टाकण्यात आली असून मुरुमाचा वापर अत्यल्प प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
रस्त्याच्या कामात अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटप्रमाणे) काम झाले नसून संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगत आवश्यक ठिकाणी नाली बांधण्यात आलेली नसल्यामुळे पावसाळ्यात शेतात पाणी साचून शेतीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित कामाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून चौकशी करावी तसेच रस्त्याचे काम दर्जेदार व नियमानुसार करून घ्यावे, अशी मागणी केली आहे. ही तक्रार जिल्हाधिकारी बीड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामीण पोलीस ठाणे परळी यांनाही पाठविण्यात आली आहे.
निवेदनावर दत्तु नारायण दहिफळे, वैजनाथ लक्ष्मण दहिफळे, दत्तात्रय मानाजी दहिफळे, सुनील गणपती दहिफळे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामस्थांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा