चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

 महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड!


चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आधीच उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांवर उकाड्यात रात्र काढण्याची वेळ आली.

विशेष म्हणजे अद्याप पावसाळ्याची खरी सुरुवातही झालेली नाही. केवळ किरकोळ पाऊस पडताच वीजपुरवठा खंडित होत असेल, तर मुसळधार पावसाच्या काळात परिस्थिती किती बिकट होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे महावितरणकडून दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात चार-पाच थेंब पावसातच वीज गायब होत असल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कागदोपत्री तयारी आणि प्रत्यक्षातील निष्क्रियता यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.

वीज खंडित झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांतील नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

"चार थेंब पावसात वीज जाते, मग मुसळधार पावसात काय होणार?" असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. महावितरणने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार