ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख राहणार उपस्थिती
परळीवर बारामती प्रमाणे प्रेम करणारे एक शिस्तबद्ध, कर्मनिष्ठ नेतृत्व : स्व. अजितदादा पवार
परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या शब्दबद्ध उत्कट भावना
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या श्रद्धांजलीपर सर्वपक्षीय शोकसभा परळी वैजनाथ नगरीमध्ये आज आयोजित करण्यात आली. यावेळी सभेसमोर अत्यंत वेदनादायी मनाने शोकप्रस्ताव सादर केला. निष्काम कर्मयोगी, कर्तव्यपरायण व निःस्वार्थ लोकसेवक राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्मनिष्ठ नेतृत्व गमावले आहे. परळी वैद्यनाथ नगरीचे आणि दादांचे नाते तसे जुनेच; मात्र आ. धनंजयजी मुंडे साहेबांमुळे अधिक दृढ झाले. सन २००९ मध्ये विधान परिषद निवडणुकीत विधानसभेतील आमदार सदस्यांचे कमी पडणारे मतदान स्व. दादांनी मिळवून दिले आणि धनुभाऊंचा आणि दादांचा ऋणानुबंध सुरू झाला. तद्नंतर नगर परिषद निवडणूक २०११ मध्ये आम्ही १२ सदस्यांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी परिवारात आमचा प्रवास सुरू झाला. अन् दादांनी वैद्यनाथ नगरीला ‘सुवर्णजयंती नगरोत्थान महाजलअभियान’ या योजनेतून पहिली सुधारित पाणीपुरवठा योजना भेट दिली.
२०१४ साली राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी महाआघाडीचे सरकार राज्यातून गेले आणि महायुतीची सत्ता आली. एक प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षाचा काळ सुरू झाला होता.२०१४ ते २०१७ या २.५ वर्षांच्या काळात परळी-वै. नगरीचा नगराध्यक्ष म्हणून धनुभाऊ आणि स्व. दादांनी माझ्यासारख्या अत्यल्पसंख्याक समाजातील एका युवक कार्यकर्त्याला जबाबदारी दिली. त्यावेळी मराठवाड्यातील तरुण नगराध्यक्षांपैकी मी एक होतो.तात्कालीन विरोधी पक्षातील नेता म्हणून विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादांनी जबाबदारी स्वीकारली आणि विरोधी पक्षनेतेपद आपले लढवय्ये नेते आ. धनंजयजी मुंडे साहेब यांना देऊन परळीकरांचा सन्मान पहिल्यांदा राज्यात वाढवला. आदरणीय आ. धनंजय मुंडे साहेबांनी देखील आपल्या ‘मुंडे बाण्यातून आणि संघर्षाच्या वारशातून’ महाराष्ट्र राज्यात चांदा ते बांदा लोकप्रियता आणि लोकसंचय निर्माण करून सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून राज्याचे शिर्षस्थ नेते म्हणून उदयास आले, ते स्व. दादांच्या धनुभाऊ यांच्यावरील प्रेम आणि विश्वासामुळे.पुढे त्यांना कृषी मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अशी तीनवेळा मंत्रिमंडळात संधी देऊन तसेच पक्ष प्रवक्ता, स्टार प्रचारक या महत्त्वपूर्ण संघटनात्मक जबाबदाऱ्या सातत्याने देत राहिले.स्व. दादांसमवेतच्या अनेक आठवणी माझ्या आहेत. परळीत लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर, डॉ. भालचंद्र वाचनालय इमारत भूमिपूजन, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत लोकार्पण यांसह अनेक विकास कामांच्या सोहळ्यांत दादा परळीत आले असता एका दिग्गज नेत्याने नगराध्यक्षाचा सन्मान कसा करावा, हे लक्षवेधी होते.
कुठलीही फीत कापताना, श्रीफळ वाढवताना “अध्यक्ष कुठे आहेत?” असे सातत्याने ते विचारणा करायचे. तसेच न.प.च्या जी.बी. हॉलमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये डायसवर मला बाजूला बसवून घेतले होते. हा क्षण कधीच मी विसरू शकणार नाही.तेव्हा एकदा परळीत कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नांदेडला निघाले असता छत्रपती संभाजी महाराज चौक येथील हायमास्ट प्रज्वलित होता. धनुभाऊ सोबतच होते. साहेब माझी पाठराखण करत होते, मात्र दादांनी ऐकून न घेता “नगराध्यक्षाला फोन लावा” म्हणून निर्देश देत मला चांगलेच झापले होते. अजूनही तो क्षण आठवला तर थरकाप होतो.आ. धनंजय मुंडे साहेबांसोबत अनेक वेळा दिवाळी पाडवा निमित्ताने बारामतीमध्ये दादांना भेटायला जायचो. एका वर्षी शहराध्यक्ष म्हणून पाच वर्षांचा अहवाल ‘ओंजळ’चे प्रकाशन दादांच्या हस्ते करण्यात आले. दादा बिमार असतानाही काटेवाडी येथील निवासस्थानी आम्हाला भेटायला हॉलमध्ये आले होते. त्यावर्षी तब्येत चांगली नसल्याने महाराष्ट्रातून आलेल्या लाखो कार्यकर्त्यांना दादांची भेट होऊ शकली नाही, मात्र ते बीड जिल्ह्यातील आणि परळीतील सहकाऱ्यांना भेटले. इतके दादा आपल्या जिल्ह्यावर आणि परळीवर प्रेम करायचे.मुंबईमध्ये पक्षाच्या आढावा बैठकीत अनेकदा दादांची भेट व्हायची. एकदा तर योगायोगाने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदेश कार्यालयात दादांची सर्व प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक होती. तितक्या कार्यबाहुल्यातून दादांनी सर्वसमक्ष मला बुके देऊन शुभेच्छा दिल्या. तो अविस्मरणीय क्षण मी कधीच विसरू शकत नाही.परळीच्या प्रत्येक सभेत दादा त्यांच्या भाषणाच्या अगोदर त्यांच्या आणि आ. मुंडे साहेबांच्या स्वीय सहाय्यकाकडून पदाधिकाऱ्यांची नावे भाषणात नामोल्लेख करण्यासाठी यादी घ्यायचे आणि मागे बसलेला मी, माझ्याकडून शहराध्यक्ष म्हणून कोणी प्रमुख पदाधिकारी यादीत विसरला तर नाही ना, ही खात्री करून घ्यायचे.
दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अनेक महत्त्वपूर्ण विकास कामे हाती घेतली होती. त्यात जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी २०० कोटींचे कौशल्य निर्माण करणारे ‘इनोव्हेशन सेंटर’, विमानतळ, तारामंडळ, महत्त्वाचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्व. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नूतनीकरण यांसह अनेक महत्त्वाकांक्षी विकास कामांना मंजुरी दिली होती, ज्यामुळे आपल्या जिल्ह्याचा — बीड नगरीचा — रूप पालटणार आहे.परळी वैद्यनाथ नगरीवर दादांचे बारामतीसारखेच प्रेम जडले होते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास योजना, कृषी महाविद्यालय, पशुपालन महाविद्यालय या परळी नगरीचे अवघे रूप बदलणाऱ्या योजना मंजूर केल्या.नियती कसा खेळ करते, बघा. २७ तारखेला आ. धनंजय मुंडे साहेबांचा फोन आला की येणाऱ्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात परळी शहरातील उर्वरित महत्त्वाची कामे प्रस्तावित करायची असून तुम्ही सर्व प्रस्ताव घेऊन मुंबईला या. मी दादांचा २९ जानेवारीचा वेळ परळी नगर परिषदेसाठी घेतला आहे.काळाने ही भेटच होऊ दिली नाही.नगर परिषद निवडणूक विजयानंतर ही पहिलीच भेट; अन् दादांची भेटल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया पाहू शकलो नाही, हे आयुष्यभर शल्य मनात राहील.
- बाजीराव भैय्या धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष-परळी वैजनाथ.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा