ओंकार साखर कारखान्याकडून आवाहन...

 ऊस वाहतुकीच्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवा : अपघात टाळा 




सहायक मोटार वाहन निरीक्षक ऐश्वर्या संजय कराड व ओंकार साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर  वैभव व्ही. काशीद यांचे आवाहन

परळी वै. ,प्रतिनिधी...

     पांगरी येथील ओंकार साखर कारखाना – युनिट क्रमांक ८ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हर्षल डाके  (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई) , ए. जी. शेख (मोटार वाहन निरीक्षक अंबाजोगाई) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक मोटार वाहन निरीक्षक ऐश्वर्या संजय कराड यांनी तोडणी – वाहतूक ठेकेदार, वाहन चालक यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्यावर ऊस भरलेले वाहन उभे करू नये, मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीम लाऊन वाहन चालवू नये, तसेच दारू किंवा इतर नशापान करून वाहन चालवू नये. याप्रमाणे सूचना देण्यात आल्या. 

     या कार्यक्रमात ऊस वाहतूक ठेकेदार, ऊस वाहतूक करणारे वाहन चालक , बैलगाडी चालक , साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचा-यांना रस्त्यावरून ऊस वाहतूक करताना घ्यावयाची काळजी , अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, तसेच अपघात झाल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मोटार वाहन कायद्यातील तरतुदी समजावून सांगण्यात आल्या. तसेच सामाजिक भान ठेऊन सुरक्षित वाहतूक करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. ज्यामुळे रात्रीच्या वेळी होणा-या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमात उपस्थित ऊस वाहतूक ठेकेदार , वाहन चालक यांना सखोल माहिती मिळण्याकरिता वाहतुकीचे नियम , कायदे यांचे माहितीपत्रके व पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. ऊस वाहतूक करणा-या वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघातमुक्त रस्ते घडविण्याच्या उद्देश्याने राबविण्यात आलेला हा कार्यक्रम जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. 

    कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर वैभव व्ही. काशीद , मुख्य शेतकी अधिकारी  जगन्नाथ शिंदे ,  लक्ष्मण चौगुले इतर खातेप्रमुख व इतर कर्मचारी उपस्थित होते. रस्त्यावर अपघात झाल्यास दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका, अपघातग्रस्तांना शक्य होईल ती मदत करा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!