#जोशींचीतासिका....भाग १
आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार?
भाग १
#जोशींचीतासिका
शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच.
सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर
परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो.
कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते.
तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास
आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे बिल होऊनही फरक पडला नाही की मग लातूरला रेफर केले जाते.
तिथेही हीच प्रक्रिया पुन्हा रिपीट करून पेशंट पुण्याला पाठवला जातो. एव्हाना त्या कुटुंबांची आर्थिक बाजू पूर्णतः कोलमडलेली असते. वेळेत मिळाल्या तरी शासकीय योजनांचा मर्यादित लाभ मिळून उपयोग नसतो. शक्य असल्यास आहे नाही ते तारण ठेवून किंवा अवाजवी दराने कर्ज काढून पुण्याचा पर्याय संपला की रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय मुंबईतील शासकीय रुग्णालय गाठतात.
सर जे. जे, सेंट जॉर्जेस, जी. टी., कामा आणि आल्ब्लेस, के. ई. एम., लोकमान्य टिळक, नायर, टाटा मेमोरियल आदी शासकीय रुग्णालये हे त्या वेळी संबंधितांना मंदिर वाटू लागतात. ज्यांना यातही यश येत नाही त्या कुटुंबातील सदस्यांची अवस्था काय होत असेल? ही कल्पनाच प्रचंड वेदनादायी आहे.
मग, माझा साधा प्रश्न आहे प्रत्येक तालुका, जिल्हा पातळीवरील शासकीय रुग्णालये मुंबई सारखे सक्षम का केल्या जात नाहीत?
सरकारी 'रेवड्या' नकोत, सक्षम 'रुग्णालये' हवीत!
शासनाने लाडकी बहीण अन् मोफत रेशन, बस तिकीट सारखे रेवडी कल्चर बंद करून सर्व रुग्णांना मोफत किंवा आवश्यक असल्यास माफक दरात रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल सक्षम करावेत.
खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उपचारांचे दर, औषधांचा खर्च, पॅथॉलोजी, सोनोग्राफी, सी टी स्कॅन आदी द्वारे कशी लूट होते ते सुद्धा आपण जाणतोच. या अनुषंगाने सर्वत्र जनतेने हा विषय हाती घेणे आवश्यक आहे. याबाबत एक लेख मालिका सुरू करत आहे त्यासाठी तुमचे अनुभव, निरीक्षण आणि सूचनांचे स्वागत आहे.
जय हिंद 🇮🇳
अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ
चलभाष क्रमांक : 8983555657
दि. ७ मे २०२६
तळटीप : कोणीही स्वतःवर ओढवून घेऊ नये ही विनंती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा