जादूटोणा व फसवणूक करणाऱ्या महिलेला बीड जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी तडीपार; उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश



बीड येथील मोमीनपुरा पेठ भागातील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या शेख नाजिया शेख पाशा या महिलेला बीड जिल्ह्यातून पुढील सहा महिन्यांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २० मे रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित महिलेवर २०१४ ते २०२४ या कालावधीत जादूटोणा करणे, नागरिकांची फसवणूक करणे यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्या क्रूर कृत्यांमुळे नागरिकांच्या मालमत्तेला व जीविताला धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

आदेशानुसार, या महिलेला दोन दिवसांच्या आत बीड जिल्ह्याची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सहा महिने दंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. हद्दपारीच्या काळात ती ज्या नवीन ठिकाणी राहील, तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात तिला दर आठवड्याला हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सोडल्यानंतर १० दिवसांच्या आत संबंधित पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. या काळात निवडणुका आल्यास केवळ मतदानाच्या दिवशीच अटींवर जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!