राजेश झंवर यांना सहआरोपी करण्याची ठेवीदारांची जोरदार मागणी
आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपीस ‘१५ लाखांची मदत’ राजेश झंवर यांची कबुली
राजेश झंवर यांना सहआरोपी करण्याची ठेवीदारांची जोरदार मागणी
परळी / प्रतिनिधी-
परळीतील आर्थिक घोटाळा प्रकरणाने आता नवे नाट्यमय वळण घेतले असून, माहेश्वरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेश झंवर यांच्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. राजस्थानी मल्टीस्टेटच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले जगदीश बियाणी,अभिषेक बियाणी यांच्यासह जयप्रकाश बियाणी यांना सुमारे १५ लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याची कबुली त्यांनी पत्रकार परिषदेत दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही मदत ‘मानवी नात्याने’ केल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, या कबुलीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राजेश झंवर यांच्या या विधानानंतर ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आर्थिक गुन्ह्यातील आरोपीस मदत करणे हे भारतीय दंड संहिता कलम 212, कलम 216 IPC तसेच कलम 107/109 IPC अंतर्गत गुन्हा ठरू शकतो, असा ठेवीदारांचा दावा आहे. त्यामुळे राजेश झंवर यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पत्रकारांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या झंवर याने जाहीर माफी मागावी
ठेवीदारांच्या प्रश्नांना आवाज देणारे पत्रकार केशव मुंडे यांच्यावर ‘सुपारीबाज पत्रकार’ असा आरोप केल्यामुळे पत्रकारितेच्या वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू- ठेवीदारांचा इशारा
या संपूर्ण घडामोडींमुळे ठेवीदारांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून, सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी पुढे येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- प्रशासन मौन का?
या प्रकरणात अद्याप तपास यंत्रणेकडून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र वाढत्या दबावामुळे लवकरच चौकशीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा