पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी
एल-निनो परिस्थितीची शक्यता : परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी
परळी शहराच्या पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करू- पाणीपुरवठा सभापती सौ.जयश्री गित्ते
परळी वैजनाथ, दि. १३ जून — राज्यात यंदा एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत धरणे, तलाव व इतर जलस्रोतां मधील पाणीसाठा यांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या अनुषंगाने आज परळी नगरीच्या नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आणि पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्रीताई रविंद्र गित्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वाण प्रकल्पावर जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल-निनोचा परिणाम राहण्याची शक्यता असून राज्यातील जलस्रोतांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शासनाच्या विद्यमान धोरणानुसार पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले असून त्यानंतरच इतर वापरांचा विचार केला जाणार आहे. शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील धरणे, जलाशय व जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा आराखडे तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.राज्यात संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांना अखंडित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी नागापूर येथील वाण प्रकल्पावर प्रत्यक्ष जाऊन भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात परिस्थिती निर्माण झाली तर काटेकोरपणाने नियोजन करता यावे या दृष्टिकोनातून त्यांनी ही पाहणी केली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या बाबतीत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.परळी शहराला पाणीपुरवठा करणारे वाण धरण व या ठिकाणची सद्यस्थिती जाणून घेऊन उपलब्ध पाण्यासाठी नियोजन करून नागरिकांना अविरत पाणीपुरवठा करण्याबाबतचे नियोजन येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या वतीने निश्चित करण्यात येईल असे यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले.परळी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा याबाबतीत कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून काटेकोर व योग्य नियोजन करण्यासाठी नगरपालिका कटीबद्ध असल्याचे नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी यावेळी सांगितले.
तर पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्रीताई गित्ते यांनी सांगितले की, शहराच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनामध्ये अधिकाधिक सुलभता आणून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नागापूर वानप्रकल्प येथील नगरपरिषदेच्या जलसाठा याचे सूक्ष्म व काटेकोर नियोजन करू. परळी शहरातील पाणीपुरवठा याचे योग्य व सुटसुटीत वेळापत्रक तयार करणार आहोत. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठा विभाग अधिकाधिक प्रभावी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ पद्मश्री धर्माधिकारी यांच्यासह परळी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्रीताई गित्ते यांच्यासह माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, नगरपरिषदेचे रा. काँ. गटनेते वैजनाथ सोळंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा