परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक एका युवकाचा मृत्यू !
सीसीटीव्हीत घटना कैद, मध्यरात्री गाडी आणि आरोपी घेतला ताब्यात
परळी वैजनाथ | एमबी न्यूज वृत्तसेवा....
परळी वैजनाथ येथे प्रशांत प्रल्हाद देशमुख या युवकाला एका थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली. या घटनेत प्रशांत देशमुख यांना गंभीर अवस्थेतअंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी परळी पोलिसांनी मध्यरात्रीनंतर संबंधित थार गाडी व आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत आहे. फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देशमुख कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमा होत केली होती.
मध्यरात्रीनंतर लागला आरोपी व गाडीचा शोध
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली व मध्यरात्रीनंतर लागला आरोपी व गाडीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी थार गाडी मिळुन आली आहे आरोपी नामे नागेश विश्वनाथ मुडे रा. भोपळा याला आटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या अपघातातील गंभीर जखमी प्रशांत प्रल्हाद देशमुख यांचा सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा