पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन
परळी रेल्वे विकास समितीच्या धरणे आंदोलनाच्या दणक्यानंतर द म रेल्वेचे सिकंदराबाद विभागीय व्यवस्थापकांनी परळीत घेतला आढावा
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांना भेटून निवेदन सादर केले.
परळी रेल्वे विकास समितीच्या ०८ जून च्या धरणे आंदोलना नंतर दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांनी आज (दि.१८) सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकापासून भेट देऊन नविन रेल्वे स्थानक उभारणी,रेल्वे मार्गाची कामे, प्रशासकीय विषय,प्रवाशी सुविधा आदींबाबत परळीत आढावा घेतला. परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश असूनही अपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये परळी वैजनाथ जंक्शनचे मध्य रेल्वेमध्ये हस्तांतरण, स्थानकावर पिट लाईन मंजूर करणे आणि ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पर्यटक माहिती केंद्र उभारणे यांचा समावेश आहे.
याशिवाय मुंबई-लातूर एक्सप्रेस, मछलीपट्टणम-बिदर एक्सप्रेस आणि हैदराबाद-बिदर इंटरसिटी या रेल्वेगाड्यांचा परळीपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे. चार ज्योतिर्लिंगांना जोडणारी ‘ज्योतिर्लिंग एक्सप्रेस’ सुरू करण्याबरोबरच सिकंदराबाद-जम्मू तवी, कन्याकुमारी- उधमपूर, रामेश्वरम- ओखा आणि हैदराबाद- अजमेर या नव्या रेल्वे सेवा परळी मार्गे चालविण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. परळी वैजनाथ, पुणे, मुंबई आणि हैदराबाद यांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, तसेच कोल्हापूर- धनबाद आणि कोल्हापूर- नागपूर या रेल्वेगाड्या दररोज धावाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर जलालपूर परिसरात नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारावा, तसेच शिवाजीनगर आणि जुन्या बसस्थानक परिसरात भुयारी मार्ग निर्माण करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी आणि घाटनांदूर-अंबाजोगाई-जा मखेड-दौंड या महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
यावेळी परळी रेल्वे विकास समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जी. एस. सौंदळे, मुख्य समन्वयक कैलास तांदळे, सत्यनारायण दुबे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे शाखा अध्यक्ष चेतन सौंदळे यांच्यासह परळी शहराच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह नगरसेवक वैजनाथ सोळंके,अनंत इंगळे,अंजली माळी,अर्चना रोडे, महेंद्र रोडे, पूजा तोतला, पांडुरंग राठोड,माऊली आघाव,आर. जी. स्वामी, श्रीकांत पाथरकर मिलिंद घाडगे, चित्रा देशपांडे, विद्या खिस्ते, विजया दहिवाळ, आत्मलिंग शेटे,गजानन कोकीळ आणि शेख एजाज यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा