दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर
परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-
वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन होऊन जात आहेत.
पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर्वणी ठरली आहे.या कथा सोहळ्यात प्रसिद्ध भागवतमर्मज्ञ, ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर आपल्या ओजस्वी आणि मधुर वाणीमधून गेल्या चार दिवसापासून परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद् भागवत कथा सुरु आहे. आजच्या पंचम दिनी श्रीमद् भागवत कथेतील श्रीकृष्ण चरित्रावर त्यांनी विवेचन केले. आजचा कथेतील गोवर्धन पूजा या मुद्द्यावरून सविस्तर बोलताना त्यांनी आपल्या संस्कृतीची आध्यात्मिक परंपरा ही पर्यावरण पूरक व पर्यावरण संरक्षक असल्याचे सांगितले. जागतिक स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण थांबवला पाहिजे. आपल्या आध्यात्मिक सिद्धांतांमधून मानवी जीवनाला समृद्ध आणि सुसंस्कृत बनण्याचा संदेश दिला आहे. अध्यात्मातील सिद्धांतांना प्रत्यक्ष जीवनात उतरवून त्याचा आत्मबोध घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.श्रीकृष्ण भगवंताच्या चरित्रातून मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंचे मार्गदर्शन मिळते.सर्वच बाबी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतात.आजच्या काळात तर या संदेशाची मानवाला नितांत गरज निर्माण झाली आहे. याचे मर्म आकलन करुन अनुकरण व जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन हभप बाळुमहाराज उखळीकर यांनी यावेळी केली.
या कथेदरम्यान विविध प्रसंगाच्या अनुषंगाने सादर होणारी श्रवणीय भजने व अभंगांची प्रमाणे यामुळे वातावरण मंतरून जात आहे.भाविकांना भजनानंदाची अद्भुत अनुभुती प्राप्त होत आहे. गोवर्धन पूजेचे महात्म्य, यामागचे धार्मिक,सांस्कृतिक, सामाजिक, तत्त्वज्ञान आणि श्रीकृष्ण चरित्रातून या प्रसंगातून मानवाने शाश्वत समृद्धीचा संदेश याबाबतचे विश्लेषण या कथा प्रसंगात ऐकायला मिळाले. यावेळी कथास्थळी प्रतिकात्मक गोवर्धन पूजा व छप्पन पदार्थांचा नैवेद्य भाविकांच्या वतीने अर्पण करण्यात आला. या श्रीमद्भागवत कथेला भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा