युवकांचा स्तुत्य उपक्रम....
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष
परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :
परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले.
आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले.
मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. साठेनगर परिसरात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. अनेकांनी तरुणाच्या घरी जाऊन त्याचा व कुटुंबीयांचा सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
समाजाच्या तळागाळातील कुटुंबातून आलेल्या या तरुणाने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण साठेनगर आणि परळी शहराचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्याच्या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा संदेश त्याच्या यशोगाथेतून मिळत आहे.
वडिलांच्या हलगीचा ताल आणि मुलाच्या देशसेवेचे स्वप्न... संघर्षाच्या मातीतून उगवलेला हा अग्निवीर आज हजारो तरुणांसाठी प्रेरणेचा दीप ठरला आहे," अशा भावना साठेनगरातील नागरिकांनी व्यक्त केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा