MB NEWS-फसवणूक >>> मालक राहिला बाजूलाच: बनावट मालक उभा करत बनावट कागदपत्रे देवून 3 हेक्टर 55 आर जमीनीचे केले खरेदीखत !
फसवणूक >>> मालक राहिला बाजूलाच: बनावट मालक उभा करत बनावट कागदपत्रे देवून 3 हेक्टर 55 आर जमीनीचे केले खरेदीखत !
परळी वैजनाथ प्रतिनिधी...
शेतजमीन नावावर करून घेताना व त्याचे खरेदीखत करताना सर्व पडताळण्या केल्या जातात. तसेच लिहून देणार, लिहून घेणार, साक्षीदार, शपथपत्रे, बायोमेट्रिक ओळख पटवणे, आधार कार्ड, वकील अशा सविस्तर प्रक्रियेतून खरेदी खताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात होते. मात्र यातूनही फसवणुकीचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मूळ जमीन मालक बाजूलाच राहिला व त्याच्या जागी बनावट मालक उभा करत बनावट कागदपत्रे तयार करून निबंध कार्यालयात सादर करत सर्व पडताळण्या पूर्ण करून तीन हेक्टर 55 आर जमिनीचे खरेदीखत झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी दुय्यम उपनिबंधक परळी यांनीच आता पोलिसात बेकायदेशीर व अनाधिकृतरित्या खरेदीखत दस्तनोंदणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार , परळी येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक नईम अहमद शेख यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या सविस्तर फिर्यादीत शेतजमिनीच्या खरेदीखत दस्तऐवज नोंदणी मध्ये बेकायदेशीर व अनाधिकृत दस्तऐवज नोंदवून खरेदीखत झाल्या बाबतची माहिती दिली आहे. परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथे ज्ञानोबा तुकाराम जोगदंड रा.पठाण मांडवा यांच्या मालकीची तीन हेक्टर 55 आर शेतजमीन आहे. या जमिनीच्या खरेदीबाबत 30 फेब्रुवारी 2021 रोजी आरोपी पंडित शामराव किरवले रा. आचार्य टाकळी, शिवकांत पंडित किरवले रा. आचार्य टाकळी, हरीबाई पंडित किरवले रा. आचार्य टाकळी, सूर्यकांत सिद्राम कांबळे रा. हडको नांदेड यांनी संगणमत करून मूळ जमीन मालक ज्ञानोबा तुकाराम जोगदंड रा. पठाण मांडवा यांच्या परस्पर तीन हेक्टर 55 आर.जमिनीचे बनावट कागदपत्र तयार केले व दुय्यम निबंधक कार्यालय परळी येथे अनाधिकृत व बेकायदेशीर खरेदीखत नोंद करून घेतली.
याबाबत जमीन मालक ज्ञानोबा तुकाराम जोगदंड यांनी आपली फसवणूक झाली म्हणून 12/04/2022 रोजी जिल्हा सहनिबंधकांकडे तक्रार केली होती. तसेच लोकशाही दिनात ही तक्रार घेण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्रकारात पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयामार्फत फौजदारी दाखल करण्याबाबतच्या परवानगीसाठी त्यांनी अर्ज केला होता. या संदर्भाने सखोल चौकशी केल्यानंतर या जमिनीच्या खरेदीखत दस्त नोंदणी मध्ये चूक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणांमध्ये मूळ जमीन मालकाच्या परस्पर बनावट जमीन मालक, बनावट दस्तऐवज, बनावट शपथपत्रे, बनावट आधार कार्ड सादर करत आरोपितांनी हे खरेदीखत दस्तऐवज नोंदणी करून घेतल्याचे लक्षात आले. मूळ जमीन मालकासह प्रशासनाचीही यामध्ये फसवणूक झाली आहे.
त्यामुळे याप्रकरणी प्र. दुय्यम निबंधक नईम अहमद शेख यांच्या फिर्यादीवरून या आरोपींविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 419, 420, 465, 468, 471, 34 भादवी तसेच नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 82, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनी चंद्रकांत गोसावी हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा