पालघर येथील 48 शेतकऱ्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण

“कृषीकुल” आधुनिक शेतीचे विद्यापीठ; देशभरातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाचे केंद्र

पालघर येथील 48 शेतकऱ्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

ग्लोबल विकास ट्रस्टच्या सिरसाळा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या “कृषीकुल” शेतकरी प्रशिक्षण केंद्राने आधुनिक व शाश्वत शेतीचे एक प्रभावी आणि आदर्श मॉडेल उभे केले आहे. बीड जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता हे केंद्र आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. परिणामी, येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न लक्षात घेता, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, पिक पद्धतीतील बदल आणि नव्या संधींचा शोध अत्यावश्यक ठरतो. याच दृष्टीने “कृषीकुल” शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध, सखोल आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन देत त्यांना सक्षम बनविण्याचे काम करत आहे.

नुकतेच पालघर जिल्ह्यातील 48 शेतकरी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी कृषीकुल येथे दाखल झाले. या प्रशिक्षणात रेशीम शेतीचे सर्वांगीण मार्गदर्शन देण्यात आले. जमिनीची तयारी, आळी संगोपन, रेशीम शेड उभारणी, व्यवस्थापन, रोग ओळख व प्रतिबंध तसेच कोष संकलन यांसारख्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. अल्पभूधारक व आदिवासी शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती ही उत्पन्नवाढीची प्रभावी संधी ठरू शकते, या उद्देशाने हे प्रशिक्षण विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. जलनायक मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून “प्रति एकरी एक लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्लोबल विकास ट्रस्ट कार्यरत आहे. आजपर्यंत 5,000 हून अधिक गावांतील 30,000 पेक्षा जास्त शेतकरी या उपक्रमाशी जोडले गेले असून, सुमारे 7 कोटी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असतानाच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होत आहे.

उच्च दर्जाचे प्रशिक्षण संकुल; देशभरातून शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

सिरसाळा येथील “कृषीकुल” हे जागतिक दर्जाचे शेतकरी प्रशिक्षण केंद्र असून, येथे फळबाग लागवड, जल व मृदा संधारणा तसेच रेशीम शेतीचे सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण विभागांसह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेऊन आधुनिक शेतीत यश संपादन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!