ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी
आगीचे तांडव : गोठ्यात बांधलेल्या गाईंना आगीतून वाचवण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू
आगीमध्ये आठ गाई, पंधरा शेळ्या व तब्बल दीडशे कोंबड्या ठार
धारूर, प्रतिनिधी....
धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील रेपेवाडी गावातील नरसिंह वस्ती येथे मंगळवार रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत मोठ्या प्रमाणावर पशुधनही दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोट्याला आग लागलेली असताना आत मध्ये असलेल्या पशुधनाला वाचवण्यासाठी या वृद्ध शेतकऱ्याने धाव घेतली होती... परंतु त्याचवेळी गोट्याचे छप्पर त्याच्यावर कोसळल्याने जनावरांसह या शेतकऱ्याचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामभाऊ एकनाथ रेपे (वय ८०) हे आपल्या पत्नीसह शेतातील कोठ्यामध्ये वास्तव्यास होते. कमी उंचीच्या दगडी भिंती, गवताचे छप्पर आणि एकाच दरवाज्याची रचना असलेल्या या कोठ्याला चुलीमुळे अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे लक्षात येताच रामभाऊ रेपे हे गोठ्यातील जनावरे सोडवण्यासाठी आत गेले. मात्र, आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केल्याने कोठ्याचे लाकडी छत कोसळले. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही आणि आगीत अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या दुर्घटनेत एकूण ८ जनावरे, १५ शेळ्या आणि सुमारे १५० कोंबड्या होरपळून मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच कोठ्यातील चारा व इतर साहित्यही आगीत भस्मसात झाले.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बालाजी शिनगारे ,संजय गायसमुद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तसेच घटनेस्थळी तात्काळ धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.दरम्यान, धारूर तहसीलचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली असून संबंधित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे रेपेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा