नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...
परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह
परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी आदी विविध संवेदनशील पदांवरील अधिकारी इतर औष्णिक, जल आणि पवन ऊर्जा प्रकल्पांकडे हलविण्यात आले आहेत.
प्रशासकीय आदेशानुसार अधिकाऱ्यांची उरण वायू वीज केंद्र, तसेच भुसावळ, चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, पोफळी, वैतरणा, नाशिक आणि मुंबई येथील विविध प्रकल्पांमध्ये बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या जागी कोणतीही तत्काळ नियुक्ती न झाल्याने प्रकल्पातील मनुष्यबळावर ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकाच आदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी बाहेर गेल्याने परळी औष्णिक प्रकल्पातील प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजावर त्याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे कर्मचाऱ्यांसह ऊर्जा क्षेत्राचे लक्ष लागले आहे. बदल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पातील पुढील नियोजनाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या बदल्यांबाबत कोणताही वेगळा अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी स्पष्ट केले. "या बदल्या नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असून काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसारही करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यामागे अन्य कोणतेही कारण नाही," असे त्यांनी सांगितले.
मात्र, एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्याचवेळी नव्या नियुक्त्यांचा अभाव यामुळे परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या भविष्यातील कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, महानिर्मितीकडून याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बदल्यांमध्ये यांचा आहे समावेश....
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील बदल्यांमध्ये शमिना अर्जुमन रफिक उल इस्लाम (कार्यकारी अभियंता), संदीप भिमराव कुंदे, भूषण गंगाधर मेश्राम (अतिरिक्त कार्यकारी अभियंते), सुनिल ज्ञानोबा पवार (व्यवस्थापक), शशिकांत इंगवले, धीरज राजेशिर्के, पवन रोकडे, निलेश गिरीपुंजे, अश्विन यादव (उपकार्यकारी अभियंते), संजय गुजराथी, ज्योती नवनागे (सहाय्यक अभियंते), अविनाश जाधव, सूर्यकांत मदने (सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ), अर्जुन नागरगोजे, विशाल मुंडे, गोविंद नागरगोजे (कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ), रणजीत पाटील (कनिष्ठ सुरक्षा अधिकारी), ज्ञानेश्वर घोंगे (प्रभारक-श्रेणी १) आणि मोहित खालकर (वाहक-नि-अग्नियंत्र) यांचा समावेश आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा