मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

रामचंद्र इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार – २०२६’ च्या मानकरी आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांची प्रेरणादायी जीवनगाथा

"जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो पद, प्रतिष्ठा आणि सत्तेमुळे नव्हे; तर समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्यामुळे!"

समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही. त्यांचे अस्तित्वच एका विचाराचा, एका संघर्षाचा आणि एका परिवर्तनशील प्रवाहाचा अविभाज्य भाग बनून जाते. आपल्या कार्याने, संवेदनशीलतेने, ध्येयनिष्ठेने आणि समाजहिताच्या अखंड बांधिलकीने ज्यांनी जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले, त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत आधारस्तंभ, बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित प्रवर्गातील सदस्य स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे (अप्पा) भारजकर!

*आंबेडकरी चळवळीचे तत्त्वनिष्ठ आधारस्तंभ: स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे*:

बीड जिल्ह्याचे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले माजी जिल्हा परिषद सदस्य, स्मृतिशेष रामचंद्र मरीबा इंगळे यांचे २३ जून २०१८ रोजी झालेले निर्वाण ही आंबेडकरी चळवळीची मोठी हानी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला.

*महत्त्वाचे लढे व योगदान:*-

स्मृतिशेष रामचंद्र इंगळे यांनी गायरान जमीन हक्क लढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार चळवळ, रेशनधारकांचे प्रश्न, बहुजन समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न, शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला व विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

*राजकीय व सामाजिक वाटचाल:*- भारज गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून ते १९६२ साली परळी-अंबाजोगाई-रेणापूर परिसरातील बौद्ध समाजातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले पहिले मागासवर्गीय नेते ठरले. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार झाला होता.

*जिल्हा परिषदेतील कार्य:*

बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य म्हणून कार्य करताना त्यांनी सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.

*आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सहभाग:*-

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या भूमिहीनांच्या सत्याग्रहात सहभाग, ‘एक गाव-एक पाणवठा’ अभियान, गायरान जमिनींसाठीचा लढा आणि नामांतर चळवळीतही त्यांनी सक्रिय योगदान दिले.


*समर्थ वारसदार आणि इंगळे परिवार:*

त्यांचा सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय वारसा उपा. केवळबाई रामचंद्र इंगळे, त्यांचे सुपुत्र आयु. बालासाहेब रामचंद्र इंगळे, आयु. वंदना बालासाहेब इंगळे, अनंत रामचंद्र इंगळे, राजेंद्र रामचंद्र इंगळे, भीमशाहीर स्वीतम अनंत इंगळे, आयु. जयश्री विश्वनाथ सिरसाठ, डॉ. भारती इंगळे-सोनवणे, इंजि. भावना इंगळे, सामाजिक कार्यकर्ते ब्रीजेश भैय्या इंगळे, भूषण इंगळे यांच्यासह संपूर्ण इंगळे परिवार विविध क्षेत्रांतून समर्थपणे पुढे नेत आहे.

भगवान बुद्धांची करुणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरील निष्ठा, साधी राहणी आणि समाजहितासाठीची अखंड बांधिलकी यामुळे स्मृतिशेष रामचंद्र (अप्पा) इंगळे हे आजही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. त्यांचे कार्य, विचार आणि संघर्ष पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत राहतील.

*‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार’ – एक प्रतिष्ठित सस्मान*:

आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ, स्मृतिशेष मा. रामचंद्रजी इंगळे (अप्पा) भारजकर यांच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन म्हणून स्थापन करण्यात आलेला ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार’ हा सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार आहे.

२०१९ पासून या पुरस्काराच्या माध्यमातून समाजकारण, शिक्षण, वैद्यकीय सेवा, सांस्कृतिक क्षेत्र आणि आंबेडकरी चळवळीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते स्मृतिशेष एन. के. सरवदे (अप्पा), भानुदासजी देवरवाडे, डॉ. मधुकर कांबळे, नागनाथ जोगदंड, स्मृतिशेष ख्वाजा बशीरोद्दिन ख्वाजा मोइनोद्दीन, प्राचार्य डॉ. दादाहरी कांबळे आणि ज्येष्ठ पँथर मा. आर. डी. व्हावळे यांसारख्या मान्यवरांनी या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढविली आहे.

*२०२६ च्या पुरस्काराची निवड:*

 या परंपरेत २०२६ सालच्या पुरस्कारासाठी आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांची झालेली निवड ही त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक, धार्मिक आणि संघटनात्मक कार्याची अधिकृत दखल आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा तपशील:

स्थळ: लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ

*दिनांक व वेळ:*रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता


*अभिनंदन व सदिच्छा:*

आयु. करुणा धम्मानंद कांबळे यांचे अभिनंदन मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश इंगोले, संस्थापक सचिव बालासाहेब इंगळे, मार्गदर्शक साहित्यिक-संपादक रानबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सी. व्ही. गायकवाड, प्रमुख कार्यवाह ब्रिजेश इंगळे तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.


*आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांचे बालपण, शिक्षण आणि वैचारिक जडणघडण:*

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील माळहिप्परगा या गावात करुणाताईंचा जन्म झाला. बालपण शिरूर ताजबंद येथे संस्कारांच्या समृद्ध वातावरणात घडले. सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलीने शिक्षणाच्या बळावर स्वतःची वैचारिक जडणघडण घडवावी, समाजकार्यात स्वतःला झोकून द्यावे आणि पुढे हजारो महिलांसाठी प्रेरणास्थान व्हावे, ही बाबच त्यांच्या जीवनप्रवासाचे वैशिष्ट्य ठरते.

बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना त्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच साधली नाही, तर सामाजिक वास्तवाचे भानही आत्मसात केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत वडील आयु. लक्ष्मण वाघमारे यांचे विचारमूल्य आणि सासरे आयु. तातेराव कांबळे यांचे सामाजिक भान यांचा मोठा वाटा आहे. याच संस्कारांनी त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, समाजासाठी जगण्याची प्रेरणा आणि परिवर्तनासाठी कार्य करण्याची जिद्द निर्माण केली.

*सामाजिक आणि धम्मकार्याची यशस्वी वाटचाल*:

तथागत गौतम बुद्ध, महात्मा, छत्रपती शिवाजी महाराज, जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीने प्रभावित होऊन २०१४ पासून त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू नेहमीच वंचित, शोषित, उपेक्षित आणि विशेषतः महिलांचे सक्षमीकरण हा राहिला आहे.

ग्रामस्तरावरील भारतीय बौद्ध महासभेच्या शाखाध्यक्ष पदापासून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज जिल्हास्तरीय नेतृत्वापर्यंत पोहोचली आहे. ही वाट सोपी नव्हती. पुरुषप्रधान व्यवस्थेत, ग्रामीण सामाजिक रचनेत आणि अनेक पूर्वग्रहांच्या वातावरणात काम करताना त्यांनी संघर्षाचे असंख्य टप्पे पार केले. मात्र प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची क्षमता त्यांना सतत पुढे नेत राहिली.

*मराठवाड्याच्या महिला श्रामणेरी बौद्धाचार्या:*

करुणाताईंच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक उपलब्ध्यांपैकी एक म्हणजे मराठवाड्याच्या महिला श्रामणेरी बौद्धाचार्या म्हणून त्यांना मिळालेला मान. बौद्ध धम्माचा अभ्यास, धम्मप्रसार, स्त्रियांच्या धार्मिक सहभागाला प्रोत्साहन आणि बौद्ध संस्कृतीच्या मूल्योंचे जतन या क्षेत्रात त्यांनी दिलेले आणि देत असलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी धम्मकार्याला केवळ धार्मिक कार्यक्रमांच्या चौकटीत न ठेवता त्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले.

धम्म त्यांच्या दृष्टीने केवळ श्रद्धेचा विषय नाही; तो मानवमुक्तीचा मार्ग, समतेचा संदेश आणि करुणेचा जीवनमंत्र आहे. त्यांच्या कार्यात भगवान गौतम बुद्धांच्या करुणेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा सुंदर संगम दिसून येतो.

*महिला संघटन आणि वैचारिक नेतृत्व:*

अखिल भारतीय बौद्ध महासभा, लातूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक महिलांना सामाजिक आणि वैचारिक नेतृत्वासाठी प्रेरित केले आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये संघटनशक्ती निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांवर जागृती करणे, संविधानिक मूल्यांचा प्रचार करणे आणि स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा देणे हे झुकते माप असणारे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरते. आज अनेक महिला त्यांच्याकडे केवळ नेत्या म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आणि संघर्षातील आधारवड म्हणून पाहतात.

*कौटुंबिक सहकार्य आणि समृद्ध वारसा:*

यशस्वी सामाजिक कार्यामागे कुटुंबाचा आधार असतो. करुणाताईंच्या आयुष्यात हा आधार त्यांच्या पती धम्मानंद तातेराव कांबळे यांच्या रूपाने लाभला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या किनगाव शाखेचे अध्यक्ष म्हणून तेही सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. सासूबाई ललिता तातेराव कांबळे, कन्या विशाखा आणि वैशाखी यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे. समाजकार्य, धम्मकार्य आणि कुटुंब या तिन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन साधणे हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण आहे.

*सन्मान आणि पुरस्कारांची गौरवगाथा*:

त्यांच्या कार्याची दखल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी वेळोवेळी घेतली आहे:'पुण्यश्लोक अहिल्यारत्न पुरस्कार – २०२३’, सार्वजनिक जयंती उत्सव समिती, किनगाव यांच्यातर्फे प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या स्त्री नेतृत्वाचा गौरव आहे.'नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन गौरव पुरस्कार – २०२५’, महाराष्ट्र पोलिस मित्र सोशल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या व्यापक सामाजिक योगदानाचा सन्मान आहे. भारतीय दलित पँथर संरक्षण हक्क परिषदेसह अनेक सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

*सरपंचपद - लोकविश्वासाची अभिव्यक्ती आणि संकल्प*:

किनगावसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांची निवड ही केवळ राजकीय घटना नाही; तर ती लोकविश्वासाची अभिव्यक्ती आहे. सामाजिक कार्यातून निर्माण झालेला विश्वास, सर्वसामान्यांशी जपलेला जिवळ्याचा संवाद, जनसमस्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि लोकहितासाठी काम करण्याची प्रामाणिक वृत्ती यामुळेच जनतेने त्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या आगामी संकल्पामध्ये किनगावचा सर्वांगीण विकास, सामाजिक सलोखा, महिलांचे सक्षमीकरण आणि संविधानिक मूल्यांवर आधारित ग्रामव्यवस्था निर्माण करणे हे ध्येय स्पष्टपणे दिसून येते.

*एक प्रज्वलित विचार*:

करुणाताईंचा गौरव म्हणजे एका व्यक्तीचा गौरव नाही. तो ग्रामीण स्त्रीशक्तीचा गौरव आहे. तो धम्मनिष्ठ जीवनमूल्यांचा गौरव आहे. तो बुद्ध-शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या सातत्यपूर्ण सामाजिक प्रवासाचा गौरव आहे. त्यांचे जीवन हे संघर्ष, समर्पण, संयम, नेतृत्व आणि करुणेचे विलक्षण उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे की परिवर्तनाची सुरुवात एका व्यक्तीपासून होऊ शकते, पण तिचा प्रभाव संपूर्ण समाजावर पडू शकतो.

आजच्या स्पर्धात्मक, स्वार्थप्रधान आणि मूल्यसंकटाच्या काळात करुणाताईंसारखी व्यक्तिमत्त्वे समाजासाठी आशेचा दीपस्तंभ ठरतात. त्यांच्याकडे पाहताना समाजकार्य अजूनही जिवंत आहे, विचारांची मशाल अजूनही प्रज्वलित आहे आणि परिवर्तनाची वाट अजूनही ध्येयवेड्या कार्यकर्त्यांनी उजळलेली आहे, याची खात्री पटते.

आयुष्यमाननी करुणाताई धम्मानंद कांबळे यांना ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार – २०२६’ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्यांच्या पुढील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, धम्मप्रसारक आणि लोकहितकारक कार्यासाठी मंगलकामना!

✍️

प्रा. डॉ. सिद्धार्थ सत्यभामा आबाजी तायडे

(अध्यक्ष, मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र)9822836675

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या