मातृभाषेतील शिक्षणामुळे गुणवत्ता निर्माण होते,
पालकांनी मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे-सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख
सामाजिक बांधिलकी जोपासत संजय देशमुख यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप
परळी वैजनाथ दि.०१(प्रतिनिधी)
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेतील शिक्षणामुळे गुणवत्ता निर्माण होते, पालकांनी मुलांना मराठी शाळेतच शिक्षण द्यावे असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख यांनी केले. ते गाढे पिंपळगाव येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षक संजय देशमुख यांनी १० वर्षं सेवा केली. त्यानंतर ते माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी नौकरी केलेल्या जुन्या शाळेत सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेला भेट वस्तू दिल्या. यानिमित्ताने शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत माजी विद्यार्थी आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गोपीनाथ सोनवणे व शिक्षकांनी संजय देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सपत्नीक सत्कार केला. यावेळी आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना भावना अनावर झाल्या होत्या. सत्काराला उत्तर देताना संजय देशमुख यांनी सांगितले की, या विवेकानंद विद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी शासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर सह विविध पदांवर कार्यरत आहेत. यामुळे गावासह परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना याच शाळेत शिक्षण दिले पाहिजे. मातृभाषेत शिक्षण घेतलेलेच विद्यार्थी पुढे जिवनात यशस्वी होत असतात याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. आजही शाळा गुणवत्ता जोपासत आहे तसेच शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली बांधिलकी जोपासत शाळेस मदत केली पाहिजे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक गोपीनाथ सोनवणे उपस्थित होते. यावेळी संजय देशमुख यांच्या सुविद्य पत्नी सविता देशमुख, संकेत, यांच्यासह माजी विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअर विजय वलांडे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड कडबाने, संजय सोनवणे, सुरेश सोनवणे, मुख्याध्यापक प्रभाकर खोडवे, राजाभाऊ कराड, दामोदर घोडके, एकनाथ आरसुळे, दिलीप वाघमोडे, विलास आरसुळे, मुख्याध्यापक सुनील राडकर, प्रा प्रविण फुटके, केशव राडकर, शाळेतील शिक्षक श्री स्वामी, श्री उपाडे, श्री राडकर, श्री घोडके, सिमा काजळे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का सलगर, स्वागत गीत तेजस्वी सोनवणे, अश्विनी आरसुळे, प्रास्ताविक तेजस्वी सोनवणे, आभार श्री स्वामी यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा