धनंजय मुंडेंच्या स्वीय सहाय्यकांनी जागवली दादांची अविस्मरणीय आठवण....!

पगार नव्हे, आत्मसन्मान वाढवणारा नेता

अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं पर्व संपलं आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेला, कडक शिस्तीचा हा नेता आतून किती हळवा आणि माणुसकी जपणारा होता, याचा प्रत्यय आम्हाला २०१२ साली आला.

त्यावेळी आम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून नुकतेच रुजू झालो होतो. केवळ ७,८२५ रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होतं. पगारवाढीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ही फाईल जेव्हा अजित दादांकडे आली, तेव्हा त्यांनी जे केलं, ते केवळ दादाच करू शकतात!

विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या २ ते २.५ हजार रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव ऐकताच दादा त्यांच्या खास शैलीत कडाडले – “अरे, १० हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट १५ हजारांचा प्रस्ताव द्या!” एका क्षणात आमचा पगार दुप्पट झाला. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे, त्या निर्णयाने आम्हाला जगण्याचा आत्मविश्वास आणि कामाचा आत्मसन्मान मिळाला.

दादांचं दातृत्व इथेच थांबलं नाही.फडणवीस सरकारच्या काळात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी वेतन २५ हजार रुपये केलं.महाविकास आघाडी सरकारमध्ये दादांनी पुन्हा पुढाकार घेत हे वेतन ३० हजार रुपये केलं.आणि विशेष म्हणजे, मागील वर्षी अर्थसंकल्पात हे वेतन ४० हजार रुपये करण्याचा त्यांचा ठाम मानस होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी ते नक्कीच प्रत्यक्षात उतरलं असतं… कारण ते शब्दांचे पक्के दादा होते.

पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच काळाने त्यांना आमच्यातून हिरावून नेलं.सामान्य माणसाच्या पोटाचा विचार करणारा, पदापेक्षा माणूस मोठा मानणारा असा नेता पुन्हा होणं कठीण आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली दादा. तुमचे उपकार आमची पिढी कधीच विसरणार नाही. 🙏

“हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है,

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा।”

(हजारो वर्षे निसर्ग वाट पाहतो, तेव्हा कुठे एखादा असा कर्तृत्ववान माणूस जन्माला येतो.)

✍️ प्रशांत जोशी (PA to श्री.  धनंजय मुंडे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!