आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांना ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार–२०२६’ प्रदान
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी येथे दैनिक वृत्तरत्न सम्राट आयोजित भव्य वाचक मेळाव्यात समाजकार्याचा गौरव करणारा विशेष सोहळा उत्साहात पार पडला. आंबेडकरी चळवळीतील तत्त्वनिष्ठ आधारस्तंभ, बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले सदस्य तथा स्मृतिशेष मा. रामचंद्रजी (अप्पा) इंगळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार–२०२६’ यंदा भारतीय बौद्ध महासभा, लातूर जिल्हाध्यक्ष तथा किनगावच्या लोकनियुक्त सरपंच आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि आकर्षक मानपत्र असे होते. सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, बौद्ध धम्मप्रसार आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी स्मृतिशेष मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी करुणाताई कांबळे यांच्या समग्र सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या कार्यातील सातत्य, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि समाजहिताची बांधिलकी अधोरेखित केली. स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे यांच्या विचारांचा वारसा समाजपरिवर्तनाच्या कार्यातून पुढे नेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांनी, "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, न्याय आणि बंधुतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हा पुरस्कार मला नव्या उमेदीने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे," असे भावनिक प्रतिपादन केले.
याप्रसंगी दैनिक वृत्तरत्न सम्राटचा भव्य वाचक मेळावाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संपादक कुणाल बबनराव कांबळे यांच्या हस्ते झाले, तर प्रा. प्रदीप रोडे अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर ज्येष्ठ प्रतिनिधी उत्तम हजारे, विचारवंत अजयकुमार गंडले, डॉ. दयानंद झिंजुर्डे, प्राचार्य दुष्यंत कटारे, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, प्राचार्य सी. व्ही. गायकवाड, संपादक मोहन व्हावळे, भगवान साकसमुद्रे, भैय्यासाहेब आदोडे, विकास रोडे, विनोद कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक, दैनिक सम्राटचे तालुका प्रतिनिधी तथा भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. यावेळी अनेक दानशूर व्यक्तींनी दैनिकाच्या बळकटीसाठी आर्थिक सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली.
पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यिक रानबा गायकवाड, स्मृतिशेष मा. रामचंद्रजी इंगळे सामाजिक सेवा प्रतिष्ठान, अंबाजोगाईचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, सचिव बालासाहेब इंगळे,सामाजिक न्याय सेलचे ता. अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, धम्मानंद कांबळे, प्राचार्य सी. व्ही. गायकवाड, गोविंदराव सोनवणे, डॉ. आकाश सोनवणे, कवि-निवेदक बा. सो. कांबळे, जयश्री इंगळे-शिरसाट, प्रा. शंकर सिनगारे, डॉ. बबन मस्के, प्रा. बी. एम. खरात, दयानंद सावळे, प्रा. आर. बी. होके, साहित्यिक नागनाथ (नाना) बडे, दत्ता वालेकर, विठ्ठलराव झिलमेवाड,विलास ताटे, शाहीर इंगळे, प्रकाश इंगळे, इंजी. विश्वजीत पाटील, उबाळेताई, पुष्पा कांबळे, आयु. सत्यभामा तायडे, आयु. सुनीता भगवान जगताप, आयु. वैशाली तायडे , विष्णू तायडे ,चंद्रमणी वाघमारे,विकास वाघमारे,सम्राट गायकवाड, विद्याधर शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कवि-निवेदक बा. सो. कांबळे यांनी केले, तर मानपत्राचे वाचन आणि आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले.
समाजसेवा, सामाजिक बांधिलकी, आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि लोकहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा