पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून अभिनंदन...
चार तासांत अल्पवयीन मुलाचा शोध; परळी ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई
परळी वैजनाथ, प्रतिनिधी —
परळी तालुक्यातील नागापूर येथील १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत त्याचा शोध घेण्यात परळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या तत्पर कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागापूर येथील उर्मिला सुभाष सौंदडे (वय ४४) यांनी आपल्या मुलाला अज्ञात व्यक्ती फूस लावून घेऊन गेल्याची तक्रार शुक्रवारी (दि. १०) परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक एम. डी. शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलाच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यानुसार एक पथक गंगाखेड परिसरात तर दुसरे पथक परळी शहरात शोधमोहीम राबवत होते.
तपासादरम्यान संबंधित मुलगा परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात आढळून आला. त्यानंतर त्याला सुरक्षित ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलिस अधीक्षक (अंबाजोगाई) भीमराव टिळेकर,अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम. डी. शिवरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पगारे व त्यांच्या पथकाने केली. अल्पवयीन मुलाचा अवघ्या चार तासांत शोध लावल्याने परळी ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा