मागण्या मान्य करा अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियने पाळला 'काळा दिवस' !

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

       देशभरातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी १० जुलै रोजी 'काळा दिवस' पाळत आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियने परळीत केलेल्या या आंदोलनात न्याय मागण्यांसाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

      बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मार्च २०२५ मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली आशा सेविकांच्या प्रोत्साहनपर मानधनवाढीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. वाढीव प्रोत्साहन रक्कम तत्काळ अदा करावी, गेल्या एका वर्षाची थकबाकी द्यावी तसेच यासंदर्भातील शासन आदेश तातडीने काढावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. ४ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या मिशन स्टिअरिंग ग्रुपच्या बैठकीत आशा सेविकांचे निश्चित मानधन ₹२,००० वरून ₹३,५०० करण्याचा निर्णय झाला होता. तसेच १० वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या आशा सेविकांना ₹२०,००० ऐवजी ₹५०,००० देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वर्षभर उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. आशा सेविका अत्यल्प मानधनावर आरोग्य विभागातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असून, अनेक अतिरिक्त कामांचा ताण, अहवाल सादर करण्याची सक्ती, अपमानास्पद वागणूक आणि प्रोत्साहन रकमेतील कपात अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, आशा व गटप्रवर्तकांना कामगाराचा दर्जा, किमान ₹२६,००० मासिक वेतन, ईएसआय, ईपीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन, सामाजिक सुरक्षा, नियमितीकरण, सहा महिन्यांची सशुल्क प्रसूती रजा, पदोन्नती धोरण, प्रवास भत्ता, स्कूटर सुविधा, डिजिटल कामासाठी टॅबलेट व डेटा सुविधा अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत.

          मागण्या मान्य न झाल्यास ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली येथे देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी व मध्यान्ह भोजन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी प्रा. खाडे बी. जी., किरण सावजी, सुवर्णा रेवले, आशा लांडगे , हेमा काळे भारती राख, सुवर्णमाला मुंडे, राधा आलट, लता लांडगे, फरजाना शेख, सावित्रा कदम, राजश्री थावरे आदींसह आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...