✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख.....

प्रबोधनाचा दीपस्तंभ : प्रा. डॉ.बळीराम पांडे यांची राष्ट्रीय वाटचाल



एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व केवळ तिच्या पदावर, पुरस्कारांवर किंवा सन्मानांवर मोजले जात नाही; ते तिच्या संघर्षातून, मूल्यनिष्ठ जीवनातून आणि समाजासाठी दिलेल्या योगदानातून अधोरेखित होत असते. काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याने स्वतःपुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती एका विचाराची, एका चळवळीची आणि एका सामाजिक ध्येयाची ओळख बनतात. प्रा. डॉ. बळीराम पांडे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. मराठवाड्याच्या मातीत घडलेले हे अभ्यासू प्राध्यापक, परिवर्तनवादी विचारांचे वाहक, साहित्यिक, कुशल संघटक आणि समाजप्रबोधनाचे अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावले आहेत.

अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयनिष्ठेचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. बालपणीचा "बळी" हा मुलगा शिक्षणाच्या बळावर, अथक परिश्रमाच्या जोरावर आणि संकटांशी झुंज देत उच्च शिक्षणाच्या शिखरावर पोहोचला. जीवनात आलेल्या अभावांनी त्यांना खचवले नाही; उलट प्रत्येक संकटाने त्यांना अधिक सक्षम, अधिक संवेदनशील आणि अधिक कर्तृत्ववान बनविले. म्हणूनच विद्यार्थीप्रिय शिक्षक, विचारवंत, मित्र, अभ्यासक आणि समाजाभिमुख कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

देवगिरी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असून त्यांनी अध्यापनाला केवळ व्यवसाय न मानता समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये चिकित्सक दृष्टी, संविधाननिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि मानवी मूल्ये रुजविण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. त्यांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले नाहीत, तर जबाबदार नागरिक म्हणून घडले.

मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक चळवळींमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अन्यायग्रस्त, उपेक्षित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. समाजकारण आणि शिक्षण यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. विश्रांतीपेक्षा समाजकार्य अधिक महत्त्वाचे वाटणारा हा कार्यकर्ता आजही त्याच उत्साहाने जनसंपर्क, वैचारिक प्रबोधन आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय आहे.

तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या महामानवांच्या समतावादी, मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचा समाजात प्रसार व्हावा, हीच त्यांच्या आयुष्याची दिशा राहिली आहे. ज्ञान, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये त्यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू आहेत.

सुमारे चार दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांचे नेतृत्व केले. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी जीवनापासून सुरू झालेली त्यांची वैचारिक वाटचाल आज राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. संघर्षाने त्यांना थांबवले नाही; संघर्षानेच त्यांना घडवले.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आदरणीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली २००७ पासून त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने कार्य केले.आजही हे कार्य निरंतर सुरू आहे. संस्थेच्या शैक्षणिक, संशोधनपर आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी निष्ठेने हातभार लावला. संस्थेची प्रगती हीच स्वतःची प्रगती मानणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. निष्ठा, माणुसकी, संघटनकौशल्य आणि मूल्याधिष्ठित कार्यपद्धती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली.

त्यांच्या शैक्षणिक योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांची NCERT विषय तज्ज्ञ म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम निर्मितीसाठी निवड झाली. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा नाही; तर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, मराठवाड्याची शैक्षणिक परंपरा आणि महाराष्ट्राच्या बौद्धिक सामर्थ्याचाही गौरव आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम निर्मिती ही भावी भारताच्या विचारविश्वाला आकार देणारी प्रक्रिया आहे. अशा महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी त्यांची निवड होणे ही त्यांच्या अभ्यासू वृत्ती, संशोधनक्षमता आणि शैक्षणिक नेतृत्वाची सर्वोच्च पावती आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या काळात गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि वैज्ञानिक शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा वेळी प्रा. डॉ. बळीराम पांडे यांच्यासारखे अभ्यासक राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या निर्मितीत सहभागी होणे ही देशासाठी आश्वासक बाब आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार असून, शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेला अधिक बळ मिळणार आहे.

आजच्या बदलत्या सामाजिक आणि शैक्षणिक वास्तवात ज्ञान, चारित्र्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय दृष्टी यांचा समन्वय साधणाऱ्या शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. प्रा. डॉ. बळीराम पांडे यांचे संपूर्ण आयुष्य ही त्याच मूल्यांची सजीव अभिव्यक्ती आहे. त्यांचा सन्मान म्हणजे शिक्षण, संशोधन, सामाजिक परिवर्तन आणि संविधाननिष्ठ मूल्यांचा सन्मान होय

महाविद्यालयीन शिक्षणापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी जीवन, संघर्ष, वैचारिक जडणघडण आणि नोकरीपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांची जिद्द, अभ्यासू वृत्ती, संघटनकौशल्य आणि माणसांशी असलेला आत्मीय संवाद जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले आहे. म्हणूनच त्यांचे यश हे एका मित्राचे यश नसून एका विचाराचे, एका चळवळीचे आणि एका मूल्यव्यवस्थेचे यश असल्याची भावना मनात दाटून येते.

त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननिय सदस्य मा.प्रदीपभाऊ चव्हाण, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी पाटील, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते तथा संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ.बळीराम पांडे यांचे अभिनंदन केलेआहे.

प्रा. डॉ. बळीराम पांडे यांची लेखणी अधिक प्रखर होत राहो, त्यांचे वैचारिक नेतृत्व अधिक व्यापक होत राहो आणि समाजप्रबोधनाची त्यांची अखंड ज्योत देशभर तेजाने प्रज्वलित राहो, हीच त्यांच्या राष्ट्रीय सन्मानानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!

✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे

मो. ९८२२८३६६७५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...