पंकजा मुंडे यांनी नेमकं काय केलं आवाहन?
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी भेटवस्तू; वाढदिवसाचा बडेजाव नको - पंकजा मुंडे
हारतुरे, शुभेच्छाभेट, भेटवस्तू नकोत; पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन केले आहे. तुमचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेटवस्तू आहे, असे सांगत त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ, शुभेच्छाभेटी आणि भेटवस्तूंऐवजी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले आहे.
पंकजाताई मुंडे यांचा २६ जुलै रोजी वाढदिवस असतो. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलसंवर्धन तसेच पर्यावरण संरक्षणाशी संबंधित उपक्रम राबवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक कार्यातून वाढदिवस साजरा केल्यास त्याला अधिक अर्थ प्राप्त होईल, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सत्कार समारंभ, हारतुरे किंवा भेटवस्तू न आणण्याची विनंती करत, समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी प्रत्येकाने छोटासा का होईना सकारात्मक उपक्रम राबवावा, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
पंकजाताई मुंडे यांनी नेमकं काय केलं आवाहन?
-----------------
माझा वाढदिवस साजरा करावा एवढी मोठी मी नाही. माझा वाढदिवस मोठा दिवस आहे असे आपण मानता हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण आपण मुंडे साहेबांच्या संस्कारात वाढलेलो आहोत.माझ्या वाढदिवसाचा उदो उदो केलेला कधीही आवडत नाही. आपल्या सर्वांच्या केवळ प्रेमाची मला अभिलाषा आहे. करायचाच असेल वाढदिवस तर तुम्ही मला मातेचा दर्जा दिलेलाच आहे. त्यामुळे माझ्यासाठी एक झाड लावा. हा वृक्ष आपल्या दारामध्ये लावा तो जसा जसा मोठा होत राहील तसे तसे मला ते आशीर्वाद मिळत जातील. माझ्यासाठी करायच असेल तर प्लास्टिकचा वापर शंभर टक्के कमी करा.मला वाढदिवसासाठी आपल्याला आनंदी करायचं असेल तर पर्यावरण जपण्याच्या संदर्भामध्ये आपण जागरूक रहा, आपण वसुंधरा रक्षक व्हा.एखाद्या म्हाताऱ्या माणसाची सेवा केली, एखाद्या पेशंटला मदत केली, एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला हातभार लावला, एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या अडचणीमध्ये मदत केली, कोणाला अन्न खाऊ घातलं, कोणाच्या शिक्षणाला हातभार लावला याच्यातच पंकजा ताईंचा वाढदिवस साजरा झाला असं आपण सर्वांनी ध्येय ठेवावं. त्यामुळे कोणीही माझ्या भेटीसाठी माझ्या वाढदिवसासाठी काहीही खर्च न करता जिथे आहात तिथून हे समाज उपयोगी आणि पर्यावरणाच्या साठीचे काम करावे यातच माझा वाढदिवस साजरा झाला असे होईल. हारतुरे, भेट व भेटवस्तू देणे टाळा पण वसुंधरा रक्षक नक्की व्हा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा