28 फेब्रुवारी पासून  शेतकरी कीर्तन महोत्सव

किरण माने, मयांक गांधी, विलास बडे, पैगंबर शेख, स्वप्निल चौधरी अजित अभ्यंकर  यांच्यासह दिग्गजांचे मार्गदर्शन

 सिरसाळा ( प्रतिनिधी) : शेतकरी कीर्तन महोत्सव हा परळी तालुक्यातील अभिनव प्रबोधन महोत्सव म्हणून ओळखला जात  असून या किर्तन महोत्सवाची महाराष्ट्रभर उत्सुकता असते. यावर्षीच्या शेतकरी कीर्तन महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते   मयांक गांधी,  ज्येष्ठ पत्रकार विलास बडे, सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख, प्रसिद्ध कवी डॉ. स्वप्निल चौधरी, जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. अजित अभ्यंकर  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी कीर्तन महोत्सवाचे संयोजक एड. अजय बुरांडे यांनी दिली.

 जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या बिजोत्सवाच्या निमित्ताने 28 फेब्रुवारी ते 6 मार्च यादरम्यान यावर्षीचा शेतकरी कीर्तन महोत्सव होत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बीजोत्सव जवळ येऊ लागतो तसा परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना कीर्तन  महोत्सवाची उत्सुकता लागून राहते. धारूर  तालुक्यातील कान्नापूर  येथे होणाऱ्या कीर्तन महोत्सवात आजूबाजूच्या 25 गावांचा सहभाग  असतो. यात पारंपारिक कीर्तनाबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न,  त्यांचे आरोग्य, शेतीवर होणारे पर्यावरणाचे परिणाम,  शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती आणि त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, यावर या शेतकरी कीर्तन महोत्सवात चर्चा होत असते.

 शेतकरी कीर्तन महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे उच्च दर्जाचे वैचारिक प्रबोधन होत असतानाच या कीर्तन महोत्सवातून सर्वसामान्यांचे आर्थिक शोषण होणार नाही याची काळजी घेतली जाते. 25 गावांचा हा कीर्तन महोत्सव असला तरी अत्यंत साधेपणाने तितकेच  नेटकेपणा याचे आयोजन केले जाते. भपकेबाजपणा टाळण्यासाठी दररोज एका गावातून भाकरी गोळा केल्या जातात. कीर्तन मंडपात एखादी भाजी तयार केली जाते. आपल्या घरातील एक भाकर शेतकरी कीर्तन महोत्सवाला जाते आहे या भावनेतून ही सर्व कुटुंब शेतकरी महोत्सवाशी जोडले जातात. हा नवा प्रयोग गेली चार वर्षे कान्नापूर  परिसरात केला जातो. यावर्षी या कीर्तन महोत्सवात दिग्गज प्रबोधनकारांचे आणि कीर्तनकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते आणि समाजभान असणारे सामाजिक कार्यकर्ते किरण माने,  कैकाडी महाराज मठाचे प्रमुख भारत महाराज जाधव,  जागतिक कीर्तीचे मृदंग वादक उद्धव बापू आपेगावकर यांची उपस्थिती असणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मांडणारे, प्रसंगी कमरे इतक्या पाण्यात उतरून वस्तुस्थिती जगासमोर आणणारे पत्रकार विलास बडे, विविध प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारे मयांक गांधी, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर थेट भूमिका घेणारे पैगंबर शेख, सुप्रसिद्ध कवी डॉ. स्वप्निल चौधरी, जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. अजित अभ्यंकर यांची यावर्षी व्याख्याने होणार आहेत. मधुकर महाराज बारूळकर, अविनाश महाराज भारती, जनक महाराज सोळंके, गणपत महाराज पवार, एकनाथ महाराज माने , ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांची कीर्तने होणार आहेत, तर शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या काल्याचे किर्तनाने या कीर्तन महोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती शेतकरी  एड. अजित बुरांडे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...