प्रा. विलास रोडे सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा : सामाजिक परिवर्तनाचा ध्यास जपणाऱ्या शिक्षकाला भावपूर्ण निरोप




      शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करत सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे प्रा. विलास रोडे सर हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व औपचारिक सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांचे कार्य आणि विचार समाजाला सतत प्रेरणा देत राहतील.

प्रा. रोडे सर हे पुरोगामी विचारसरणीचे अभ्यासक असून फुले , शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचारांनी प्रेरित असलेल्या शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विविध व्याख्याने, जनजागृती कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रम राबविले.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करत समाजातील अपप्रवृत्ती, अंधविश्वास आणि चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये विवेकवाद आणि तर्कशुद्ध विचारांची जपणूक करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधायक कार्यक्रम, संविधान जनजागृती उपक्रम, वाचन प्रेरणा अभियान, सामाजिक ऐक्य रॅली आदी उपक्रम राबविण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. जयंती उत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता तो सामाजिक प्रबोधनाचा माध्यम ठरावा, यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला.

महाविद्यालयीन अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि परिवर्तनवादी विचार रुजविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत.

प्रा. रोडे सर हे जुक्टा संघटनेचे सक्रिय सदस्य म्हणूनही ओळखले जातात. शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटित पद्धतीने भूमिका मांडत न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. सहकारी प्राध्यापक व कर्मचारी यांच्यात समन्वय आणि ऐक्य निर्माण करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सहकारी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर नव्या सामाजिक पर्वाची सुरुवात आहे,” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

प्रा. विलास रोडे सर यांचे व्यक्तिमत्त्व हे शिक्षक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते या तिन्ही भूमिकांचा सुंदर संगम आहे. त्यांचा आदर्श, कार्यपद्धती आणि समतावादी विचार समाजासाठी कायम प्रेरणादायी राहतील, यात शंका नाही.

     >>>>  प्रा .प्रविण महालिंग फुटके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...