राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळीत विचारांचा जागर
परिवर्तनासाठी संत, सुधारक आणि समाजक्रांतीकारक या तिन्ही भूमिका गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यातून साकारल्या- ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस
झोपडपट्टीतून उभा राहिलेला प्रवास म्हणजेच विचारांची ताकद –विशाल लोंढे
संविधानातील मूल्ये रुजविणे हेच संतांचे कार्य” – ज्ञानेश्वर महाराज वाबळे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):– समाजप्रबोधन, स्वच्छता आणि समतेचा अखंड संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळी येथे भव्य सुवर्ण शतकोत्तर महोत्सवी वर्ष सोहळा दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला.
संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परळी आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे करण्यात आले होते.
@@@@@@@
*झोपडपट्टीतून उभा राहिलेला प्रवास म्हणजेच विचारांची ताकद” – विशाल लोंढे*
उद्घाटनपर भाषणात विशाल लोंढे यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, “झोपडपट्टीत जन्मलेला एक मुलगा बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेच्या क्षेत्रात उभा राहू शकतो. हा संतांच्या विचारांचा विजय आहे. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यभर विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाचा एक घटक म्हणून प्रशासनातील अधिकारीही समाजाप्रती असलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतील, हीच आमची बांधिलकी आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
@@@@@@@@
*विचार कधी मरत नाहीत –श्रीपाल सबनीस*
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचे व्यापक विश्लेषण करताना सांगितले की, “परिवर्तनासाठी संत, सुधारक आणि समाजक्रांतीकारक या तिन्ही भूमिका गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यातून साकारल्या. विचार कधीही वाया जात नाहीत; ते काळाच्या ओघात अधिक बळकट होत जातात. गाडगेबाबांनी देवळे न बांधता शाळा, धर्मशाळा उभारल्या, अस्पृश्यतेविरुद्ध ठाम भूमिका घेतली आणि स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला, हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. हातात झाडू आणि डोक्यावर गाडगे घेऊन समाजपरिवर्तनाची मशाल पेटवणारा असा संत जगात दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले.
@@@@@@@
*संविधानातील मूल्ये रुजविणे हेच संतांचे कार्य” – ज्ञानेश्वर महाराज वाबळे*
आपल्या समाजप्रबोधनपर कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या भारतीय संविधानातील मूल्यांचा उल्लेख करत सांगितले की, समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण केल्याशिवाय शेतकरी-कष्टकरी आणि अठरापगड जातीतील माणसे सुखी होणार नाहीत. संत परंपरेपासून ते आधुनिक काळातील समाजसुधारकांपर्यंत सर्वांनी समाजजागृतीचे कार्य केले असून, हेच खरे राष्ट्रनिर्माण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
@@@@@@@@
प्रस्ताविकपर भाषणात कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वी शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त परळीतील हा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजप्रबोधन, समता आणि संवेदनशीलतेचा जागर ठरला. संतांच्या विचारांची मशाल पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक लक्ष्मण वैराळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक पृथ्वी शिंदे तसेच निमंत्रक सुशिल पोटभरे, रोहित झिंजुर्डे, विकास वाघमारे, राहुल सूर्यवंशी, विशाल डोंबे, महेश मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा