LIVE: Maharashtra Budget 2026..
‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेचा विस्तार; शेतमजुरांनाही मिळणार आर्थिक संरक्षण
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेची व्याप्ती वाढवून आता शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली.
आतापर्यंत या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळत होता. मात्र आता शेतमजूर वर्गालाही अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षेचा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेच्या विस्तारासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना अपघाती प्रसंगी मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक सुरक्षेचे कवच अधिक व्यापक होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचे ग्रामीण भागातून स्वागत होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा