लक्ष्मी मुक्ती योजना....
स्वतःच्या शेतजमिनीत पत्नीचे नाव 'सहहिस्सेदार' म्हणून लावण्याचे परळी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन
परळी वैजनाथ: प्रतिनिधी...
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या १५ सप्टेंबर १९९२ च्या परिपत्रकानुसार, स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी सामाजिक संघटनांनी केलेल्या सूचनांची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वकष्टार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या नावासोबत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली, तर महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलमांच्या अधीन राहून ही प्रक्रिया पूर्ण करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अशी करा नोंदणी:
परळी तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांना आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावायचे आहे, त्यांनी संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे रीतसर विनंती अर्ज करावा. अर्जानंतर नियमानुसार फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना जमिनीमध्ये कायदेशीर वाटा मिळणार असून, त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, परळी वै. यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा