धनंजय देशमुख व खिंडकर यांच्यातील कथित पिस्तूल प्रकरणातील दोन्ही तक्रारी खोट्या; बीड पोलिसांचा तपास पूर्ण, होणार कायदेशीर कारवाई
बीड: पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून कायद्याचा सर्रास गैरवापर करणाऱ्यांविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी आता कडक पाऊल उचलले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मे २०२६ रोजी रात्री घडलेल्या कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी पूर्णपणे खोट्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बीड पोलीस प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मस्साजोग (ता. केज) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख यांनी समाधान खिंडकर व इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये पहिली तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेलवाडी येथील रहिवासी समाधान बाबुराव खिंडकर यांनीही धनंजय देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत दुसरी तक्रार नोंदवली होती. दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून बीड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेऊन ३० मे रोजीच्या रात्री १०.०५ ते १२.०० या वेळेची सखोल पडताळणी केली. या फुटेजमध्ये कोणतीही छेडछाड झालेली नसून, फिर्यादींनी नमूद केलेली कथित घटना तिथे घडलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवून ते 'ई-साक्ष' पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. या सर्व पुराव्यांवरून दोन्ही पक्षांनी जाणूनबुजून पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वैयक्तिक कारणावरून न्याय यंत्रणेचा गैरवापर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा