विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
वादळी वाऱ्यामुळे हाहाकार; फळबागा उद्ध्वस्त, वीज यंत्रणा कोलमडल्याने अनेक गावे अंधारात!
केज: तालुक्यातील युसुफ वडगाव मंडळ आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या तीव्र चक्रीवादळसदृश वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने मोठा हाहाकार माजवला आहे. ताशी १०० ते १२५ किलोमीटरच्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धनेगाव, नायगाव, सादोळा, भालगाव, बावची आणि युसुफवडगाव परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुख्य रस्त्यांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा आणि इतर फळबागा जमिनीदोस्त झाल्या असून नागरिकांच्या घरांवरील पत्रे तसेच घरगुती व कृषी सोलर पॅनेल्स हवेत उडून गेले आहेत. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या वादळाचा सर्वांत मोठा फटका परिसरातील सार्वजनिक वीज पुरवठा यंत्रणेला बसला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांचे खांब आणि तारा जागोजागी तुटून पडल्यामुळे या भागातील दोन महत्त्वाची वीज उपकेंद्रे पूर्णपणे बंद पडली आहेत. रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला गतिमान केले असून त्यांनी स्वतः या संपूर्ण बचाव आणि मदतकार्यावर बारीक लक्ष ठेवले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा