बरकतनगर भागात सरस्वती नदी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर; नगर परिषदेची मान्सूनपूर्व तयारी वेगात!
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पूरस्थिती, पाण्याचा अडथळा आणि अस्वच्छतेचा त्रास होऊ नये यासाठी परळी वैजनाथ नगर परिषदेमार्फत बरकतनगर येथील स. नं. ७५ भागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीची मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. मानसूनपूर्व सुरू असलेल्या या कामांची माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्यासह त्या प्रभागातील संबंधित नगरसेवक व न. प.पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
या मोहिमेअंतर्गत नदीपात्रातील गाळ, कचरा, झुडपे तसेच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारे घटक हटविण्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.सुरू असलेल्या कामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता, गती आणि स्वच्छतेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. शहरातील विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व नाले व नदी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि पूरमुक्त परळी घडविण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयुब पठाण, श्रीकृष्ण कराड, अनंत इंगळे,नगरसेवक मोहसीन, नगरसेवक बब्बू, आदींसह पदाधिकारी तसेच नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा