स्व.अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा सुनेत्रावहिनी समर्थपणे पुढे नेत आहेत !..
नियोजन समितीच्या बैठकीत ना. पंकजाताई मुंडेंची जिल्ह्यासाठीची तळमळ
सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, बीडची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या
स्व.अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा सुनेत्रावहिनी समर्थपणे पुढे नेत आहेत !
मतदारसंघात विकासाच्या त्रिसूत्री वर भर देण्याचे केले आवाहन
बीड दि. ३१ ---
राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रावहिनी पवार या जबाबदारीने काम करत असून, दिवंगत अजितदादा यांच्या कार्याचा वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. दादांच्या कामाची शैली आणि कामांचा धडाका त्यांच्यात दिसतो आहे अशा शब्दांत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असं सांगत जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. सुरुवातीला सुनेत्राताई पवार यांचे ना. पंकजाताईंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, कठीण प्रसंगातून सावरत असतानाही सुनेत्रावाहिनी पवार यांनी विकासकामांवर लक्ष केंद्रीत केले. दिवंगत अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा त्या पुढे नेत असून, जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल असा मला आपल्याला विश्वास आहे.
जिल्हयाची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या
-----------
बीड जिल्ह्याबाबत बाहेर चुकीची प्रतिमा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. हा जिल्हा कष्टकरी, प्रेमळ आणि धार्मिक परंपरा जपणाऱ्या लोकांचा तसेच महिला धार्जिण जिल्हा आहे. काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच सर्वांचे समान ध्येय असावे. बीडची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या असा मोलाचा सल्ला पंकजाताई मुंडे यांनी बैठकीत दिला.
विकासाच्या त्रिसूत्रीवर दिला भर
--------------
याप्रसंगी पंकजाताईंनी सांगितले की, आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात शाळा, प्राथमिक आरोग्य आणि स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चांगला करण्याकडे प्राधान्य द्यावे. याशिवाय शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचे नियमित ऑडिट होऊन विकास प्रत्यक्ष दिसला पाहिजे. प्रशासकीय यंत्रणेनेही अधिक जनताभिमुख होण्याची गरज आहे. तालुकास्तरावरील अधिका-यांनी आपल्या कार्यालयात उपलब्ध राहून नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावावीत, असे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहिल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वहिनी पाऊस घेऊन आल्या
-------------
२०१३ च्या दुष्काळाच्या आठवणींना उजाळा देत पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, त्या काळात जिल्ह्यावर गंभीर संकट आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू करावे लागले होते. यंदाही पाच सहा दिवसापूर्वी पर्यंत अशीच परिस्थिती पुन्हा येते की काय अशी शक्यता वाटत होती. मात्र आता पाऊस झाला आहे. आपल्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पाऊस घेऊन आल्या आहेत अशी टिप्पणी करत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटवली.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा