रेल्वे, कृषी, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका

ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विकास कामांचा आढावा



वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराला पुरातन स्वरूप मिळणार ; तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी दिल्या सूचना

रेल्वे, कृषी, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका

बीड. दि. १५ जुलै-----

राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाची विभागनिहाय आढावा बैठक घेतली. रेल्वे, रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, कृषी पशूसंवर्धन, पर्यावरण, क्रीडा, नगर परिषद प्रशासन यासह सर्वच विभागांचा त्यांनी आढावा घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन गतिमान झाले आहे. 

बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी मिळणाऱ्या निधीचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम परळीकडून देखील सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला राज्य सरकारच्या वाट्याचा प्रलंबित निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेचा आढावा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने तीनशे एक कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिली आहे. या अंतर्गत होणार विकास कामांचा ना. पंकजाताई मुंडे यांनी अत्यंत आस्थेने आढावा घेतला. मुख्य मंदिर आणि मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे पुरातन स्वरूप भाविक भक्तांना अनुभवता यावे, सुधारित आराखड्याच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार होत असून हा जीर्णोद्धार कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्य आणि विचारांना साजेसा असावा अशा सूचना ना. पंकजाताई मुंडे यांनी केल्या. या आराखड्यात भाविकांसाठी प्रशस्त अभिषेक मंडप, वाहनतळ, पंचात्तर फूट उंचीची महादेव मूर्ती, हरिहर कुंडाचा विकास, लेजर लाईट शो, अशा अनेक संकल्पना राबविण्यात येणार आहेत. सदर आराखड्याअंतर्गत सर्व कामे अत्यंत दर्जेदार करण्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी सूचित केले.

एकल वापर प्लास्टिक बंदी विशेष अभियानाचा केला शुभारंभ

नगर परिषद पर्यावरण विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एकल वापर प्लास्टिक बंदी अभियानाचा ना. पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरण मंत्री या नात्याने शुभारंभ केला. हे अभियान १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार असून याअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, कॉलेज,व्यापारी वर्गात राबविण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापनांना प्लास्टिक बंदी बाबत माहिती देण्यात येणार आहे. दुकाने, आठवडी बाजार अशा ठिकाणी प्रबोधन देखील करण्यात येणार असून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्याच्या सूचना ना. पंकजाताई मुंडे यांनी विभागाला केल्या आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प दृढ करणारे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी अभियानात सहभागी होण्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी आवाहन केले.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...