पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे केले कौतुक...
पुस्तक प्रदर्शन आणि बालसभेचे इंदपवाडी शाळेत यशस्वी आयोजन
शिक्षकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या बाल वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शन आणि बालसभेच्या विषयावर विद्यार्थ्यांनी मांडलेली मते यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे दर महिन्याला बालसभा घेतली जाते आणि वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी दिली जाते. या महिन्याच्या बाल सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी युवराज गजानन मुंडे उपस्थित होता. कार्यक्रमास अतिथी म्हणून गावच्या सरपंच सौ शालूताई फुलचंदराव मुंडे, पोलीस पाटील सौ मनीषा अनंत मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशवराव मुंडे, सदस्य श्री वैजनाथराव मुंडे, आलका दिंदोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर वाचनालयासाठी आलेल्या नव्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी 'निसर्ग माझा सखा' या विषयावर आपली सुंदर मते व्यक्त केली. मागच्या वर्षीपासून सुरू झालेल्या बालसभेला विद्यार्थ्यांचा प्रत्येक वेळी वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांच्या वक्तृत्व कलेमध्ये वाढ होत आहे. प्रत्येक वर्गातून प्रथम द्वितीय क्रमांक काढले जात असून वक्तृत्व कलेबरोबरच स्वतःचे मत मांडण्याची विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे.
गावच्या पोलीस पाटील म्हणून स्पर्धा परीक्षेतून नियुक्त झालेल्या सौ मनीषा अनंत मुंडे यांचा शाळेच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला.प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली मते मांडल्यानंतर कार्यक्रमाविषयी पोलीस पाटील सौ मनीषा अनंत मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशवराव मुंडे, मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे, परीक्षक श्री विष्णू ढाकणे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी कु सुरुची अच्युत मुंडे व श्रावणी केशव मुंडे यांनी केले.
याच दिवशी दर महिन्याला घेतली जाणारी सामान्य ज्ञान स्पर्धेची परीक्षाही घेण्यात आली. दर महिन्याला नवे शंभर प्रश्न विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. मागील महिन्यातील विजेत्यांना सुपर ग्रुप मध्ये निवडले जाते. सुपर ग्रुपची परीक्षा थोडी कठीण असते.
पुस्तक प्रदर्शन, बालसभा व सामान्य ज्ञान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री चंद्रप्रकाश लोखंडे, जगदीश चौधरी, विष्णू ढाकणे, श्रीमती संध्या नागरगोजे, चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा