Viral call recording:" इतके दिवस विद्यार्थी झोपले होते का?.... शिक्षणाधिकाऱ्यांचे संताप आणणारे उत्तर

 वैद्यनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन: "उपोषण कशाचे... सगळी नाटकं चालू आहेत!" ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या कथित वक्तव्याने संतापाची लाट

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षणाचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करत सलग तीन दिवस आंदोलन करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाच "नाटक" संबोधल्याचा आरोप बीडच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर होत असून, त्यांच्या कथित वक्तव्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पवित्र शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्या संवेदनशीलतेवर सवाल उपस्थित केला जात आहे.याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून  शिक्षणप्रेमी, पालक व नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

      परळीतील वैद्यनाथ विद्यालयात १६ पैकी केवळ ६ शिक्षक शाळेत उपस्थित राहतात तर अन्य दहा शिक्षक शाळेला येत नसल्याच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शिक्षणाच्या हक्कासाठी लहान मुले रस्त्यावर उतरली, शाळेतील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडून कथितरित्या "इतके दिवस विद्यार्थी झोपले होते का?", "उपोषण कशाचे... सगळी नाटकं चालू आहेत" अशी वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.

      एकीकडे शासन शिक्षणाच्या गुणवत्तेचे गोडवे गात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या वेदना आणि प्रश्नांना अशा शब्दांत हिणवले जात असेल तर ती बाब अधिक चिंताजनक असल्याची भावना पालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागील कारणे समजून घेण्याऐवजी आंदोलनालाच नाटक ठरविण्याची भूमिका ही शिक्षण व्यवस्थेतील असंवेदनशीलतेचे उदाहरण असल्याची टीका होत आहे.विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी शिक्षण विभागावर आहे, त्याच विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आंदोलन करावे लागणे हीच यंत्रणेची अपयशाची कबुली मानली जात असताना, त्यांच्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरली गेल्याचा आरोप अधिक संतापजनक ठरत आहे.

       या संदर्भात नगरसेवक असलेल्या एका जबाबदार लोकप्रतिनिधींनी शिक्षणाधिकारी यांना दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची दखल घेण्याची विनंती केली होती.विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याच संदर्भातील दूरध्वनी संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. त्यामध्ये शिक्षण अधिकारी यांनी आंदोलनाबाबत काही अशोभनीय स्वरूपाची विधाने केल्याचा आरोप होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला गांभीर्याने न घेता, त्यावर नागरिकांचे व आंदोलकांचे समाधान करण्याऐवजी त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी भाषा वापरण्यात आल्याचे या ध्वनिफितीत ऐकू येत असल्याचा आरोप होत आहे.

    दरम्यान, व्हायरल होत असलेल्या कॉल रेकॉर्डिंगची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पडदा टाकण्यापेक्षा त्यांची दखल घेऊन जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे मत शिक्षणप्रेमी व्यक्त करत आहेत.शिक्षणासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन जर नाटक असेल, तर त्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना काय म्हणायचे? असा संतप्त सवाल आता पालक व नागरिक विचारू लागले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...