मोठ्या संख्येने वारकरी आंदोलनात सहभागी...
भामचंद्र डोंगर मुक्ती लढ्यासाठी आमदार भाई जगताप सरसावले; आझाद मैदानावरील आंदोलनास पाठिंबा
मुंबई: जगद्गुरु तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असलेल्या भामचंद्र डोंगर मुक्तीसाठी तुकया भक्त मधुसूदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार भाई जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन आपला खंबीर पाठिंबा दर्शवला. "मी प्रथम मराठा महासंघाचा कार्यकर्ता आहे आणि जगद्गुरूंच्या साधनाभूमीवर होणारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला.
भामचंद्र डोंगर हा केवळ दगड-धोंड्यांची रांग नसून आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा आहे, असे सांगत भाई जगताप यांनी या प्रश्नावर विधिमंडळात लक्षवेधी मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधून हा लढा अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मराठवाड्यात घेतलेल्या संत संमेलनांचा संदर्भ देत, त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड आणि प्रकाश महाराज बोधले यांच्यासोबतच्या कामाची आठवण करून दिली. याप्रसंगी व्यासपीठावर संत संरक्षण समितीचे मधुसूदन पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप, कार्याध्यक्ष माधवीताई माने, आध्यात्मिक आघाडीचे राज्यप्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील उपस्थित होते. पंढरपूरचे फलहारी महाराज यांनी जगताप यांना निवेदन देऊन या प्रश्नावर आवाज उठवण्याची विनंती केली. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानोटे, मुंबई शहराध्यक्ष अविनाश राणे, मराठवाडा संपर्कप्रमुख राम मोहिते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. "जगद्गुरूंच्या साधनाभूमीच्या रक्षणासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत," असे सांगत भाई जगताप यांनी सर्व संत-महंतांना अभिवादन करून आपल्या भाषणाचा समारोप केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा