शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन
परळी वैजनाथ बसस्थानकातील चिखल, खड्ड्यांमुळे प्रवासी बेहाल; तातडीने उपाययोजना करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन
परळी वैजनाथ | प्रतिनिधी...
परळी वैजनाथ येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या नवीन बसस्थानकाच्या कामामुळे तसेच पावसामुळे सर्वत्र चिखल, पाण्याचे डबके आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा नियन्त्रण प्रमुख दुसानी मॅडम परळी आगार प्रमुख सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बीड जिल्हा नियंत्रण प्रमुख दुसानी मॅडम व आगार प्रमुख सोनवणे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करत बसस्थानक परिसरातील चिखल व खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली. पावसामुळे प्रवाशांचे पाय चिखलात रुतत असून अनेकांना घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, विद्यार्थी आणि लहान मुलांसह सर्वसामान्य प्रवाशांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, बसस्थानक परिसरातील चिखल हटवून खड्डे तातडीने बुजवावेत तसेच प्रवाशांसाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी. अन्यथा शिवसेना आपल्या खास आक्रमक शैलीत "शिवसेना स्टाईल" आंदोलन छेडेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, उपतालुकाप्रमुख महेश केंद्रे, तालुका संघटक सुरेश जाधव, तालुका सचिव प्रकाश साळुंखे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा