सुशील धोकटे यांच्या प्रकृतीची केली आत्मीयतेने विचारपूस..
धनंजय मुंडे स्वतःच्या केअरटेकरचीही ‘केअर’ घेतात तेव्हा....
सुशील धोकटे यांच्या प्रकृतीची केली आत्मीयतेने विचारपूस; उपचारासाठीही केली विशेष व्यवस्था
परळी : ‘आपल्या माणसांची साथ फक्त कामापुरती नसते, तर सुख-दुःखातही असते,’ याची प्रचिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा दिली. गेली तीन दशके त्यांच्यासोबत निष्ठेने काम करणारे सहकारी सुशील धोकटे आजारी असल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेत आपुलकीचा वेगळाच आदर्श घालून दिला.
सुशील धोकटे हे मागील सुमारे ३० वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत कार्यरत आहेत. केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर मुंडे कुटुंबातील सदस्य म्हणूनच त्यांची ओळख आहे. साहेबांच्या दैनंदिन दिनक्रमापासून औषधे, आहार, प्रवास, बैठका, कुटुंबीय व कार्यकर्त्यांशी संपर्क, तसेच स्वीय सहाय्यक म्हणून विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या ते अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत.
काही दिवसांपूर्वी प्रवासादरम्यान सुशील धोकटे यांची प्रकृती अचानक बिघडली. मात्र, साहेबांच्या कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी त्रास सहन करत प्रवास पूर्ण केला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. स्थानिक स्तरावर उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलविण्यात आले.
ही बाब समजताच धनंजय मुंडे यांनी कोणताही गाजावाजा न करता सकाळीच सुशील धोकटे यांच्या घरी जाऊन त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. उपचारांची माहिती घेत “शंभर टक्के बरे होईपर्यंत कामावर येण्याची अजिबात घाई करू नको, आधी पूर्णपणे तब्येत सांभाळ,” असा दिलासादायक सल्ला दिला. तसेच पुढील उपचारासाठी पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राजकारणात मोठी पदे आणि मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची सेवा करणाऱ्या सहकाऱ्याच्या आजारपणात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा धनंजय मुंडे यांचा हा स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला. आपल्या माणसांची केवळ सेवा घेणारा नव्हे, तर त्यांच्या सुख-दुःखातही सहभागी होणारा नेता, अशी त्यांची ओळख या प्रसंगातून अधिक अधोरेखित झाली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा