दुकानात घुसून व्यापाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहरातील रामा आईस्क्रीम पार्लर, गणेशपार रोड परिसरातील दुकानात घुसून व्यापाऱ्याला मारहाण करत तोडफोड केल्याप्रकरणी तिघांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गोरक्षनाथ सोनाजी मोरे (वय ३२, व्यवसाय–व्यापार, रा. देशमुखपार, परळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. १९ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते त्यांच्या दुकानात असताना तीन चार जण दुकानात आले.आरोपींनी बेकरीतील केक व इतर साहित्य घेतल्यानंतर पैशांवरून वाद घालत फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच दगडफेक करून दुकानात नुकसान केले. आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिलीस तर तुला सोडणार नाही,अशी धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी शिवा दीपक जगतकर, महादू राधाकिशन शिंदे, लांडगे (पूर्ण नाव माहिती नाही) व एक अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, ३२४(४)(५), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. चव्हाण करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा