एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा रद्द; एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई, प्रतिनिधी :
राज्यातील शासकीय, महानगरपालिका, शासन अनुदानित तसेच विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा (Social Responsibility Service) रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, यामुळे हजारो नवोदित डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणे आणि करिअरची वाटचाल सुरू करणे अधिक सुलभ होणार आहे.

शासन निर्णयानुसार, सामाजिक दायित्व सेवा पूर्ण केल्याशिवाय पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळत होती. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयांची वाढती संख्या, दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि सामाजिक दायित्व सेवेसाठी उपलब्ध पदांची मर्यादा यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ही सेवा वेळेत पूर्ण करता येत नव्हती. परिणामी, पदव्युत्तर शिक्षणात प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शासनाने धोरणाचा पुनर्विचार करून ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

  • एमबीबीएस अभ्यासक्रमानंतरची एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा रद्द करण्यात आली आहे.
  • ज्या उमेदवारांना अद्याप सामाजिक दायित्व सेवेचे वाटप झालेले नाही किंवा सेवा सुरू झालेली नाही, त्यांना ही सेवा पूर्ण करण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • ज्या उमेदवारांची सेवा सुरू आहे, त्यांनाही उर्वरित कालावधीसाठी सेवा पूर्ण करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
  • शासन निर्णय लागू झाल्यानंतर कोणत्याही नव्या उमेदवाराला सामाजिक दायित्व सेवेचे वाटप करण्यात येणार नाही. यासाठी तयार करण्यात आलेले ऑनलाइन पोर्टलही बंद करण्यात येणार आहे.
  • सामाजिक दायित्व सेवा न केल्याबद्दल यापूर्वी दंड भरून सूट घेतलेल्या उमेदवारांना भरलेली दंडाची रक्कम परत मिळणार नाही.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एमबीबीएस पदवीधर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक वेगाने उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!