आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा

 जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाड वापरा, अन्याय सहन करू नका” – प्रा. लक्ष्मण हाके 



आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा 

माजलगाव (प्रतिनिधी) – राज्यभरात मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. माझे समाज बांधवांना आवाहन आहे की, आपल्या हातात ढाळा पाडण्यासाठी असलेली कुऱ्हाड गरज पडल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वापरा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असे ठाम वक्तव्य त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील धरणे आंदोलनात केले.

माजलगाव तालुक्यात घळाटवाडी येथे काल मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. “पोलिसांचा धाक आरोपींवर राहिलेला दिसत नाही. समाजाच्या न्यायासाठी आवाज उठवणारे आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, या घटनेत मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली. कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास दिला. यावेळी बीटे बंधूंच्या आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करताना “आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही,” असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा धनगर समाजाच्या वतीने माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून समाजातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. यावेळी माधवराव निर्मळ, शारदाताई पांढरे,माऊली सिरसट,पवण करवर, सुनिल ढाकणे,सुमंत धस, विलास नेमाने,अशोक ढोणे,विजय धाईगुडे, रामेश्वर शिंदे,किशोर पांचाळ,शंकर गावडे शामसुंदर  पांचाळ दत्ता आबुज जगन्नाथ शिंदे,सह समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार