दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा...

परळीतील सर्व आस्थापना व व्यावसायिकांनी 'फायर ऑडिट' व अग्निसुरक्षेचे नियम पूर्ण करून घेणे बंधनकारक - मुख्याधिकारी

दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

        वाढत्या उन्हाळ्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, परळी नगर परिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या जीवित व वित्तीय सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व व्यावसायिक संकुले, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना तात्काळ 'फायर ऑडिट' (अग्निसुरक्षा परीक्षण) करून घेणे आता बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

         सध्या तापमानाचा पारा वाढल्याने शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून अग्निसुरक्षा उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठे मॉल, हॉटेल्स, औद्योगिक युनिट्स आणि सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांना फायर ऑडिटच्या कक्षेत आणले आहे. केवळ ऑडिट करून न थांबता, प्रत्येक आस्थापनेमध्ये अग्निशमन यंत्र (फायर एक्स्टिंग्विशर), फायर अलार्म सिस्टम आणि आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग असणे अनिवार्य आहे. ज्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नसतील, अशा मालमत्तांची ओळख पटवून त्यांना अग्निशमन विभागामार्फत नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

       'आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५' तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६ मधील तरतुदींनुसार ही संपूर्ण मोहीम राबविण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत अग्निसुरक्षेचे नियम पूर्ण न करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अग्निसुरक्षा ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून ती आपली सामाजिक बांधिलकी आहे. सुरक्षित शहर घडवण्यासाठी सर्व नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन नगर परिषद परळी वैजनाथ मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...