दोन निवडणुका…पण परिस्थिती जैसे थे...
ग्रामपंचायत पोटनिवडणूक: परळीतील अशी एक ग्रामपंचायत जिथे दोन जागा… दोनदा निवडणूक… तरीही एकही अर्ज नाही!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
परळी वैजनाथ तालुक्यातील नागदरा-आनंदवाडी ग्रामपंचायतीची एक विलक्षण आणि विचार करायला लावणारी परिस्थिती समोर आली आहे.ग्रामपंचायतीतील दोन सदस्य पदांच्या जागांसाठी दोनदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही एकही अर्ज न आल्याने या जागा पुन्हा रिक्तच राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, ही घटना एकदाच घडलेली नसून 2023 मधील सार्वत्रिक निवडणुकीतही याच दोन जागांसाठी एकही उमेदवार पुढे आला नव्हता. त्यानंतर अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहिली.
या मागील कारण शोधले असता एक ठोस आणि संघटित भूमिका समोर आली आहे. नागदरा व आनंदवाडी या दोन गावांची मिळून ही ग्रुप ग्रामपंचायत असून, एकूण 9 सदस्य पदांपैकी 5 जागा नागदरा तर 3 जागा आनंदवाडीच्या मतदारांवर आधारित आहेत. रिक्त राहिलेल्या दोन जागा या आनंदवाडीच्या वाट्याला येणाऱ्या असल्याने, त्या गावातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंदवाडी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातो.याच पार्श्वभूमीवर, जोपर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे.
दोन निवडणुका…पण परिस्थिती जैसे थे...
2023 सार्वत्रिक निवडणूक – 2 जागा रिक्त राहिल्या.आत्ता झालेल्या पोटनिवडणूकीत – पुन्हा 2 जागा रिक्त यामुळे या जागा वर्षानुवर्षे रिक्तच राहण्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा उत्साह, चुरस आणि राजकीय रस्सीखेच पाहायला मिळत असताना, दुसरीकडे नागदरा- आनंदवाडी येथे निवडणूक प्रक्रिये बाबतची अनास्था आणि आंदोलनात्मक भूमिका स्पष्टपणे दिसून येते. आता प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आनंदवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा, ही रिक्त जागांची परंपरा पुढील निवडणुकां मध्येही कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा