ना. पंकजा मुंडे यांचा जालन्यात हाऊसफुल्ल 'जनता दरबार'
जनतेच्या समस्यांचा तात्काळ निपटारा ; प्रशासनाला दिल्या जागेवर सूचना
जालना दि. ३०-- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आपल्या दालनात 'जनता दरबार' घेतला. जनता दरबारात जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांनी एकच गर्दी केली होती. यावेळी आलेल्या शेकडो नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यांच्या कामांचा जागेवरच निपटारा केला.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय आढावा बैठका पार पडल्या, बैठकीनंतर त्यांनी पालकमंत्री यांच्या दालनात जनता दरबार घेतला.
जनता दरबारात नागरिकांनी एकट गर्दी केली होती. रस्ते, पाणीपुरवठा, वीज वितरण आणि वैयक्तिक लाभाच्या योजना अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केवळ अर्ज स्वीकारले नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून जागेवर प्रश्नांचा निपटारा केला. जनतेचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या.
नागरिक सुखावले
आपल्या लाडक्या नेत्या थेट जनतेत मिसळून संवाद साधत असल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. 'ताईंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि कामाचा शब्द दिला, आता आमचा प्रश्न सुटेल,' अशी भावना जनता दरबारात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत, मनपा आयुक्त अंजली शर्मा तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण प्रेमी स्वयंसेवी संस्थांच्या शिष्टमंडळाशी संवाद
शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी आज त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
जिल्ह्यातील व शहरातील वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणविषयक बाबींचा आढावा घेतानाच, सर्वांनी मांडलेल्या सजग सूचनांचे त्यांनी स्वागत केले. आपण सर्व
एकत्रित येऊन जेव्हा पर्यावरणाचा विचार करतो, तेव्हा परिवर्तनाची खरी सुरुवात होते. अशाच रचनात्मक संवादातून आणि समन्वयातून जालना जिल्हयाला अधिक समृद्ध आणि हरित बनवूया अशा शब्द ना. पंकजाताईंनी शिष्टमंडळाला दिला.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा