खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्वरक्षा संकल्प शिबीराचा समारोप उत्साहात

परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी) 
     खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वरक्षा संकल्प शिबीराचा गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. १९ ते ३० एप्रिल दरम्यान या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
    या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे तसेच स्वरक्षणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तायक्वांदो, कुंफू, कराटे, लाठीकाठी, तलवार यांसारख्या क्रीडा प्रकारांतील कौशल्यपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैजनाथ ईटके यांनी सांगितले की “आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे मैदानावरील खेळ कमी होत चालले आहेत. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण होते,” तर डॉ शिका जैन यांनी सांगितले की “स्वरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या अधिक सक्षम बनतात,”
“खेळ आणि शिस्त यांचा संगम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे प्रा. प्रवीण फुटके यांनी नमूद केले. अध्यक्षीय समारोप करताना नगरसेवक सचिन सारडा म्हणाले, “आजच्या काळात मैदानावरील खेळांची नितांत गरज आहे. अशा स्वरक्षा शिबिरांचे आयोजन ही काळाची गरज असून, यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाणीव दोन्ही वाढतात. तसेच प्रत्येक खेळात सातत्य असले पाहिजे” या समारोप कार्यक्रमास नगरसेवक सचिन सारडा, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष वैजनाथ ईटके, संपादक बालासाहेब कडबाने, पत्रकार प्रा. प्रवीण फुटके, कर्नाटक कुंफू कोच चंद्रकांत बलाढ्य, शिबिर प्रमुख आशिष मुंडे, शिबिर समन्वयक वैष्णवी जिगे, खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव परमेश्वर होळकर तसेच अध्यक्ष व तायक्वांदो प्रशिक्षक अंकुश भानुदास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा क्रीडा प्रशिक्षक प्रा. डॉ. चैतन्य पाळवदे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...