ऐसा आनंद सोहळा, जगमित्र नागा पाहे डोळा”

संत जगमित्रनागा अभंग गाथेच्या प्रकाशनानंतर संत जगमित्रनागांची जन्मभूमी पिरंगुटमध्ये स्वागत व सत्कार




पिरंगुट, प्रतिनिधी : ऐतिहासिक संतभूमी पिरंगुट येथील १३व्या शतकातील संतश्रेष्ठ जगमित्र नागा महाराज यांच्या दुर्मिळ अभंगांचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘संत जगमित्रनागा अभंग गाथा’ या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने संपादक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांचा स्वागत व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा ‘संत जगमित्र नागा चरित्र’ ग्रंथाचे लेखक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांनी संपादित केलेल्या या गाथेमध्ये संत जगमित्रनागा महाराजांचे दुर्मिळ अभंग संकलित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अभंगांसोबत त्यांचा सोपा व सुबोध भावार्थही देण्यात आल्याने हा ग्रंथ वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, संशोधक आणि संत साहित्यप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आर. आर. सूर्यवंशी, एस. आर. सूर्यवंशी, मठाधिपती श्री गिरी महाराज, मुळशी पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी सरपंच चांगदेव पवळे, देवराम निकटे, बाबासाहेब पवळे, छबन निकटे, ज्ञानेश्वर येनपुरे, राजेंद्र गोडांबे, बाळासाहेब वाघ, नारायण गावडे, अनुप पवळे, मारुती नवाळे, युवराज मते, देवराम पवळे, बाळकृष्ण निकटे, साहेबराव निकटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पवळे यांनी केले.

“ऐसा आनंद सोहळा, जगमित्र नागा पाहे डोळा” या अभंग ओळींप्रमाणे संत परंपरेचा गौरवशाली वारसा जतन करण्याचे कार्य या गाथेमुळे घडले असून, संतांच्या विचारांचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे पिरंगुट हे संत जगमित्र नागा महाराजांचे जन्मगाव असल्याने या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे ग्रामस्थांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...