परळी छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील फुलारी; सचिवपदी सोमनाथ वळसे, उपाध्यक्षपदी गोविंद विजापुरे यांची बिनविरोध निवड
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नाथ रोड येथील सुयोग फोटो वर्ल्डच्या सभागृहात उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील (नाना) फुलारी, सचिवपदी सोमनाथ (काका) वळसे आणि उपाध्यक्षपदी गोविंद विजापुरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सुनील फुलारी यांची अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून, गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी संघटनाबांधणी, छायाचित्रकारांचे हितसंवर्धन, व्यवसायातील तांत्रिक प्रगती, आर्थिक सक्षमीकरण तसेच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. छायाचित्रकारांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गेल्या ३० वर्षांपासून परळीतील छायाचित्रण क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून, "नाना" या नावाने ते सर्वपरिचित आहेत.
उपाध्यक्षपदी निवड झालेले गोविंद विजापुरे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारे, तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आणि सहकाऱ्यांना नेहमी मदतीचा हात देणारे छायाचित्रकार म्हणून ओळखले जातात. सचिवपदी निवड झालेले सोमनाथ (काका) वळसे हे व्यवसायात सहकार्यशील वृत्तीमुळे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरले असून, "जिथे कमी तिथे काकाची हमी" ही त्यांची ओळख आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष सुनील फुलारी यांनी, ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांचा समतोल साधत संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच छायाचित्रकारांच्या व्यावसायिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सचिव मोहन तिडके यांनी केले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार यशवंत चव्हाण, हरिप्रसाद मोदाणी, विठ्ठलराव झिलमेवाड, रवि वळसे, गोपाल मोदाणी, राजाराम तोरडमल, दिनेश घोडके, छायाचित्रकार संघटना क्रिकेट संघाचे कर्णधार संतोष चव्हाण, राहुल कुरकुट तसेच संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बाजीराव राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा